डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील जुनी नागरी वस्ती असलेला, घाऊक बाजाराची मोठी व्यापारी पेठ, कार्पोरेट कार्यालये, बँका, खासगी आस्थापना, शालेय मुलांचे शिकवणी वर्ग असलेल्या रामनगर भागात मागील काही महिन्यांपासून दिवस, रात्र महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक, व्यापारी त्रस्त आहेत. रविवारी दिवस, रात्र या भागातील वीज पुरवठा पाच ते सहा तास बंद होता.
असह्य उकाड्याने नागरिक हैराण आहेत. वीज पुरवठा बंद असला की घरातील पंखा, वातानुकूलित यंत्रे बंद राहतात. घरातील शीतकपाटे बंद राहत असल्याने नाशिवंत वस्तू खराब होतात. रामनगरमध्ये किरकोळ आणि घाऊक वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. गोदामातील माल बाहेर काढणे, आत ठेवणे या वेळेत वीज पुरवठा बंद असेल तर मजुरांना त्या भागात जाणे शक्य होत नाही, अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या. दिवसभर वीज पुरवठा नसला की उन्हाच्या चटक्याने दुकानात ग्राहक सेवेसाठी बसणे शक्य होत नाही, अशा तक्रारी रहिवासी, व्यापाऱ्यांनी केल्या. अनेक घरात वृध्द, रुग्ण, लहान बाळे आहेत. वीज पुरवठा नसला की त्यांना सर्वाधिक त्रास होतो.
अनेक महिने रामनगर हद्दीतील वीज पुरवठा खंडित होत असुनही महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिक, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. या भागातून महावितरणाला दरमहा १०० टक्के वीज देयक भरणा होतो. तरीही महावितरण अधिकारी या भागातील सततच्या खंडित वीज पुरवठ्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी महावितरणने या भागाचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
रामनगर प्रभागात अनेक टोलेजंग नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. या नवीन गृहसंकुलांमध्ये कार्पोरेट कार्यालये, बँका, खासगी आस्थापना आहेत. अनेक नवीन गृहसंकुलांना महावितरणचे स्वताचे रोहित्र नाहीत. त्यामुळे हा सर्व वीज भार या भागातील जुन्या रहिवाशांच्या वीज वापरावर येत आहे. नवीन गृहसंकुले उभारणारे विकासत, महावितरण अधिकारी याविषयी उदासीन असल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याच्या तक्रारी रहिवासी, व्यापाऱ्यांनी केल्या.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, रामनगर प्रभागात नवीन रोहित्र बसविण्यासाठी आम्ही जागा शोधत आहोत. योग्य जागा मिळवून तेथे रोहित्र बसविले की वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबेल. तसेच, ज्या नवीन गृहसंकुलांना स्वतंत्र रोहित्राची गरज आहे त्यांना तशा त्यांना सूचना करून स्वतंत्र वीज पुरवठ्याची व्यवस्था केली जाईल.
रामनगर विभागातील सततच्या खंडित वीज पुरवठ्याबद्दल सोमवारी काही राजकीय मंडळींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. रामनगर विभागाचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. विजेचा लपंडाव या भागात सुरूच राहिला तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.