कल्याण येथील मांडा-टिटवाळा भागात खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीला प्रेमाची फूस लावून उत्तरप्रदेशातील मूळ गावी पळवून नेनेल्याची घटना उघडकीस आली आहे. या संशयित आरोपी शिक्षकाचा मोबाईल गेली अनेक दिवस बंद असल्याने पोलीस त्याचा माग काढू शकत नव्हते. अखेर वीस दिवसांनी संबंधित शिक्षकाचे मोबाईलचे भौगोलिक ठिकाण (जीपीएस) उत्तरप्रदेशातील फरीदाबाद रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती टिटवाळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फरिदाबाद पोलिसांच्या साहाय्याने आरोपी शिक्षकाला राहत्या घरातून अटक केली.

ललित चौधरी असं खासगी शिकवणी चालकाचं नाव आहे. तो टिटवाळा भागात खासगी शिकवणी घेतो. त्याच्या वर्गात एक १३ वर्षांची मुलगी शिकवणीसाठी येत होती. ललित चौधरीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. दरम्यान एकेदिवशी पीडित मुलगी टिटवाळा भागातील आपल्या घरासमोर कपडे वाळत घालत होती. त्यानंतर ती तेथून अचानक गायब झाली होती. कुटुंबीयांनी तिचा वीस दिवस शोध घेतला. ती कुठेच आढळली नाही.

ती आरोपी चौधरी यांच्या शिकवणी वर्गात जात होती. चौधरी हेही त्या दिवसापासून टिटवाळ्यातून गायब असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. कुटुंबीयांनी त्याच्यावर संशय व्यक्त करून टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण ललित यांचा मोबाईल अनेक दिवस बंद होता. त्यामुळे आरोपीचा थांगपत्ता लागत नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान टिटवाळा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पंकज पाटील यांना ललित यांचा मोबाईल सुरू असल्याचे आणि तो उत्तरप्रदेशातील फरिदाबाद शहरात असल्याचे भौगोलिक ठिकाण तांत्रिक माहितीच्या आधारे मिळालं. याची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांचे एक पथक तात्काळ फरिदाबादला गेले. त्यानंतर पोलिसांनी ललितच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या निवासातून अल्पवयीन मुलीसह अटक केली. प्रेमाची फूस लावून पीडितेला आपण पळवलं होतं, अशी कुबली आरोपी शिक्षक चौधरी यानं पोलिसांना दिली.