कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी वाहणाऱ्या पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे रेल्वेचे जंक्शन असलेले कल्याण स्थानक आता अपप्रवृत्तींचेही ‘जंक्शन’ बनत चालले आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातच वेश्याव्यवसायाचे अड्डे निर्माण झाले असून भरचौकात सुरू असलेल्या या अनैतिक व्यवसायामुळे सर्वसामान्य विशेषत: महिलावर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-१लगतच्या भागात भरदिवसा शरीरविक्रय करणाऱ्या महिला उभ्या असतात. सायंकाळी गर्दीच्या वेळेतही लालचौकी, खडकपाडा येथील रिक्षा थांब्यांजवळ उभे राहून या महिलांकडून बीभत्स हावभाव, व्यवहार होण्याचे प्रकार सुरू असतात.
फलाट क्रमांक-१ च्या बाजूला फेरीवाले, रिक्षा, टांगे यांची नेहमी वर्दळ असते. येथून टिळक चौक, खडकपाडा, बेतूरकरपाडा येथे जाणाऱ्या प्रवाशांची रांग लागलेली असते. मात्र, त्याच परिसरात शरीरविक्रय करणाऱ्यांची टोळी निर्धास्तपणे वावरताना दिसते. मात्र, या महिलांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. अशा टोळक्यांमुळे येथून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य महिलांनाही अश्लील नजरा व इशाऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा अनुभव आहे.
शरीरविक्रय करणाऱ्या महिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या मनस्तापाबाबत कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना विचारणा केली असता, ‘कल्याण रेल्वे स्थानक क्रमांक एकजवळील हा परिसर आमच्या हद्दीत येत नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले, तर  अशा महिलांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यासाठी कायद्यात कोणतीही विशेष तरतूद नसल्याचे सांगत महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनीही हात झटकले.
समीर पाटणकर, कल्याण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्पनेनेही मन भयभीत होतं
कार्यालयातून संध्याकाळी उशिरा घरी परतत असताना कल्याण रेल्वे परिसरातील या भयावह परिस्थितीची आठवण जरी झाली, तरी मन भयभीत होते. वासनेने अधीन झालेल्या एखाद्या इसमाकडून कुणा निष्पाप तरुण-तरुणीचा बळी तर जाणार नाही ना, अशी भीती मनात येते.
– महिला रेल्वे प्रवासी (कल्याण)

त्वरित कारवाई व्हायला हवी

शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या रेल्वे परिसरातील वेश्यांची वर्तवणूक सर्वच नागरिकांना त्रासदायक ठरणारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.
– रेल्वे प्रवासी (कल्याण)

कारवाई सुरूच असते

आमच्याकडून वेश्यांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असते. या संदर्भात वेश्यांवर खटलेही दाखल होत असतात; परंतु त्यांना १२०० रुपयांच्या दंडावर सोडण्यात येते. महानगरपालिका तसेच महिला व बालविकास खात्यामार्फत वेश्यांना उपजीविकेसाठी साधन मिळवून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
– दिनेश कटके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महात्मा फुले पोलीस ठाणे</strong>

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitution tars kalyan station area
First published on: 25-02-2015 at 12:08 IST