अंबरनाथ/उल्हासनगर : शहरातील वाढता भ्रष्टाचार, विकासकामांतील अनियमितता आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज अंबरनाथ व उल्हासनगर या दोन्ही शहरांमध्ये आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
अंबरनाथमध्ये भाजपचा मोर्चा
अंबरनाथ शहरातील काँक्रीट रस्ते व पथदिवे प्रकल्पातील भ्रष्टाचार, अर्धवट रस्ते दुरुस्ती, वाढती गुन्हेगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव याविरोधात भारतीय जनता पार्टी (अंबरनाथ शहर) तर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाची सुरुवात होऊन तो नगरपरिषद कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व भाजप तालुका सरचिटणीस व अंबरनाथ विधानसभा समन्वयक अमितजीत गुलाबराव करुंजुले-पाटील करतील. शहरात गेल्या काही दिवसात पथदिव्यांची भीषण अवस्था भाजपने समोर आणली होती. पथदिव्यांअभावी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. चोरी आणि गैरप्रकार वाढण्याची भीती आहे. पथदिवे फक्त बसवले जातात. त्यातून प्रकार येणार कधी असा सवाल भाजपने उपस्थित केला होता. त्याविरुद्ध मोर्चाची हाक दिली होती. तर उल्हासनगर शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन होणार आहे. महायुती सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी हे आंदोलन दुपारी १२ वाजता कैलाश कॉलनी चौक, उल्हासनगर-५ येथे होईल.
या आंदोलनासाठी पक्षातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही शहरांतील हे आक्रोश मोर्चे स्थानिक प्रशासन, सरकार आणि संबंधित यंत्रणांना इशारा देणारे ठरणार आहेत. नागरिकांच्या वाढत्या नाराजीचे रूपांतर आता रस्त्यावरच्या लढ्यात होत असल्याचे चित्र दिसत आहे.