एसटी बंद असल्याने रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ांना अधिक गर्दी

ठाणे : राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांचा संप तसेच दिवाळीनंतर मुंबईतील कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलाविण्यास सुरुवात केल्याने सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर दैनंदिन तिकीट घेण्यास तसेच मासिक पास घेण्यास प्रवाशांच्या मोठय़ा रांगा लागल्या. तिकीट, पास मिळविण्यासाठी प्रवाशांना रांगेत १० ते १५ मिनिटे घालवावी लागली. त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. त्याचा परिणाम ठाणे शहरातही जाणवला. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला एसटीचा थांबा आहे. या एसटी थांब्याहून बोरिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई, विरार, पालघर या ठिकाणी बसगाडय़ा जातात. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ठाणे स्थानकाजवळील एसटी थांब्यावरून बसगाडय़ा बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे मीरा-भाईंदर, बोरिवली, विरार तसेच पालघर भागात जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी ठाणे स्थानकातून उपनगरी रेल्वेमार्गे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीनिमित्ताने गावी गेलेले

काही प्रवासी ठाणे स्थानकात उतरून बोरिवली किंवा मीरा रोडला एसटीनेच जात असतात. तसेच दिवाळीच्या रजा संपल्याने मुंबईतील कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहे. तर काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवडय़ातून दोन ते तीन दिवस कार्यालयात प्रवेश देतात.

या सर्वाचा परिणाम ठाणे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर झाला. सोमवारी सकाळी मासिक पास आणि तिकीट काढण्यासाठी ठाणे स्थानकात प्रवाशांच्या सर्वच तिकीट खिडक्यांवर मोठय़ा रांगा लागल्या होत्या. उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी करोना प्रतिबंधक लशींच्या दोन मात्रा घेणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तसेच युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास तिकीट खिडक्यांवर दाखविल्यानंतरच प्रवाशांना

तिकीट मिळते. त्यामुळे युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास किंवा प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तपासताना तिकीट खिडक्यांवरील रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक उडाली होती.

तिकीट खिडक्यांवर रांगाही वाढत होत्या.

प्रत्येक प्रवाशाला तिकीट किंवा पास मिळविण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागत होती.  विलंबामुळे अनेकांना रेल्वेगाडी सुटली. त्यामुळे प्रवाशांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचता आले नाही. तसेच प्रवाशांचा भार उपनगरीय गाडय़ांमध्ये वाढल्याने फलाट तसेच रेल्वेगाडय़ांमध्ये गर्दी वाढली होती.