ठाणे – यंदाच्या परतीच्या पावसाने जसे शेतीचे काही अंशी नुकसान होत आहे त्याच प्रमाणे सण उत्सवांवरही पावसाचे सावट आहे. सोमवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झालेल्या गरबा उत्सवात संध्याकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने अनेक गरबा रसिकांचा हिरमोड झाला. तर काहींनी बरसणाऱ्या पावसामध्ये देखील आपल्या मित्र मंडळीसह गरब्याचा आनंद घेतला. तर येत्या दोन ते तीन दिवस याच पद्धतीने पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने यंदाच्या नवरात्रीवर पावसाचे सावट आहे.

राज्यभरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून देवीची आराधना, दांडिया-गरब्याच्या रंगारंग कार्यक्रमांनी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. विविध गृहसंकुल, बैठ्या चाळी, सोसायट्यांमध्ये नागरिक स्वतःहून एकत्र येऊन गरबा व दांडियाचे आयोजन करतात. तर दुसरीकडे, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून राजकीय नेते आणि काही संघटना शहरातील मोठ्या मैदानांवर भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करतात. सजावट, प्रचंड रोषणाई, अत्याधुनिक ध्वनीव्यवस्था, नामांकित गायक-कलाकारांचा सहभाग यामुळे या कार्यक्रमांना नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र, यंदाच्या नवरात्रीत सुरू असलेल्या सततच्या पावसाने या सगळ्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

सोमवारी ठाणे जिल्ह्यात दिवसभर रिमझिम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला. संध्याकाळी अनेक ठिकाणी नियोजित गरबा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाच्या सरींनी धडक दिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ज्या मैदानांवर हजारोंची गर्दी उसळायची, त्या मैदानांवर लोक छत्री घेऊ उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी नृत्यांगण मोकळे राहिले तर काही मंडळांनी कार्यक्रम थांबवण्याचा किंवा वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयोजकांसह गरबा रसिकांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.

दरवर्षीप्रमाणे ठाणे शहरासह जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ तसेच बदलापूर येथे भव्य दांडिया महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या नेत्यांकडून लाखो-कोट्यवधींच्या खर्चाने उभारलेले मंडप, आकर्षक सजावट आणि नामांकित कलाकारांचे कार्यक्रम हे या महोत्सवांचे वैशिष्ट्य. मात्र पावसामुळे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. प्रेक्षकांची उपस्थितीही अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने आयोजकांना निराशा जाणवली.

हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उर्वरित नवरात्रीही पावसातच साजरी होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे पावसामुळे उत्सवात अडथळे आले तरी, दुसरीकडे भक्तिमय वातावरण, देवीभक्तांचा उत्साह आणि सांस्कृतिक रंगत अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

एकूणच, ठाणे जिल्ह्यातील नवरात्रोत्सव यंदा “पावसातला गरबा” म्हणून स्मरणात राहील, हे निश्चित आहे. पावसाच्या सरींसोबत देवीची आराधना आणि गरब्याचे ताल असा अनोखा संगम यंदा नागरिक अनुभवत आहेत.

तथापि, सर्वत्र असे चित्र दिसले नाही. अनेक भागांत नागरिकांनी पावसाचा अडथळा न जुमानता गरबा खेळण्याचा आनंद घेतला. तरुणाईने पावसाच्या सरी अंगावर घेत उत्साहात थिरकत नवरात्रीचा रंग कायम ठेवला. बघ्यांनीही छत्रीचा आधार घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. काही ठिकाणी पावसामुळे जागा ओली झालेली असतानाही महिलांनी पारंपरिक पोशाखात दांडिया खेळून उत्सवाची शोभा वाढवली. “देवीची आराधना आणि नवरात्रीचा आनंद पावसामुळे थांबू शकत नाही,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.