ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या भाषणातून नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर अनेक मतदारांची नोंद असल्याची बाब समोर आणली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली असता “आयुक्त निवास” हा उल्लेख केवळ मतदार यादीतील सेक्शनचा ठळक ओळखचिन्ह म्हणून करण्यात आलेला आहे. कोणत्याही मतदाराच्या पत्त्यात “नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान” असा उल्लेख नाही. त्यामुळे “१३० मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली” ही बातमी पूर्णतः चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सध्या सर्वत्र मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर मतदार याद्यांमधील घोळ दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मतदार याद्यांमधील चुका दाखविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात सदोष मतदार याद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सांगितले की नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर अनेक मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी सुमारे १३० मतदारांची नोंद असल्याचे वृत्त देखील विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले.याबाबत जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादी भाग क्रमांक ३०० मध्ये “नेरुळ सेक्टर २१, नेरुळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास” असे सेक्शनचे नाव नमूद आहे. येथे “मनपा आयुक्त निवास” हे केवळ विभागाचा (सेक्शन) ठळक ओळखचिन्ह म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. या यादीभागातील कोणत्याही मतदाराचा पत्त्यामध्ये “नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान” असे नमूद नाही. त्यामुळे संबंधित १३० मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे” ही माहिती वास्तवाशी विसंगत असल्याचे जिल्हा प्रशासन कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी उल्लेख देखील केला होता की एका मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय असा दाखवण्यात आला आहे. याबाबत ही जिल्हा प्रशासन कडून पडताळणी करण्यात आली आहे. सुलभ शौचालय विषयक दाव्याचीही पडताळणी करण्यात आली. तपासात हे ठिकाण दोन मजली असून, पहिला आणि दुसरा मजला वास्तव्यासाठी वापरात असल्याचे आढळले. संबंधित मतदारपूर्वी त्या ठिकाणी वास्तव्यास होते, मात्र सध्या ते स्थलांतरित झाले आहेत. नियमानुसार त्यांच्या नावांची वगळण्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले की, “वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही. मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत नागरिकांनी दिशाभूल होऊ नये, म्हणून हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.”