ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून भावनिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, “गद्दारांनी महाराष्ट्र, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली असली, तरी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या छाताडावर पाय देऊन महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेसाठी लढण्याचे सामार्थ्य दाखवले आहे. ‘उद्धव ठाकरे यांचा ठाकरी बाणा, कडवट हिंदुत्ववादी विचार, क्रांतीची मशाल अशाच प्रकारे कायम धगधगत राहील. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक लढ्यांचे कौतुक करत, विचारे यांनी हे नेतृत्व शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.

करोना सारख्या महामारीत उद्धव ठाकरे यांनी नागरिकांच्या हितासाठी घेतलेल निर्णय, मुंबई कोस्टल रोड, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर राजन विचारे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या कार्याचा पुनरावलोकन केले. राजन विचारे यांच्या समाजमाध्यमावर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून हा व्हिडीओ सर्व शिवसैनिक तसेच नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला एक विचार दिला, एक बाणा दिला. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी तो विचार घराघरात पोहोचवला. याच विचारांचा वारसा घेऊन शांत आणि संयमी स्वभावाने पण, तितक्याच कणखरपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, अशा शब्दात व्हिडीओच्या सुरुवातीला विचारे यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. जेव्हा करोनाच्या काळोखानं सारे जग अंधारलं होत. तेव्हा महाराष्ट्र एकटा लढला नाही तर, उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली महाराष्ट्राने जगाला दिशा दाखवली.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील करोना महामारीच्या काळात महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांची आणि विशेषता उद्धव ठाकरेंनी सुरु केलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेची प्रशंसा केली होती. प्रत्येक घरातला कुटूंबप्रमुख बनून अथक परिश्रमाने करोनासारख्या महामारीतून महाराष्ट्राला वाचवले. ऑक्सिजन, बेड, लसीकरण, प्रत्येक अडचणींवर ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दाखवून दिल संकटकाळात महाराष्ट्र झुकत नाही, तर लढतो. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. मुंबईचा कोस्टल रोड असो किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा ५ रुपयात शिवभोजन थाळी असो त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पूर्ण केला, असे म्हणत विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांच्या यांच्या पाठिंब्यामुळे आज आम्ही शिवसैनिक अन्याया विरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरतो. ‘महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही घेतलेली प्रत्येक भुमिका दिलेला प्रत्येक लढा हा आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहे वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा साहेब’….अशा अनोख्या पद्धतीने विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.