ठाणे : ठाणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्यावतीने आज, सोमवार, दुपारी ३ वाजता गडकरी रंगायतन येथून ठाणे महापालिकेपर्यंत भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षही सहभागी होणार आहे. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. त्यात “ठाणेकरांनो, तुम्हालाही अस्वस्थ वाटत आहे का? मग या अन्यायाला गाडायला या!” अशा शब्दांत विचारे यांनी नागरिकांना थेट आंदोलनात उतरून प्रशासनाला जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.

ठाणे शहर आणि जिल्ह्यात भ्रष्टाचार सुरू आहे. ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ साली झाली. आज पालिकेला ४३ वर्ष पूर्ण झाली. ४३ व्या वर्धापन दिनीच एका भ्रष्ट अधिकाऱ्याला ३५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले, ही ठाणेकरांसाठी लाजिरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्याला अलीकडेच प्रमोशन देऊन नवे पद निर्माण करण्यात आले होते, असे राजन विचारे यांनी म्हटले आहे. साडेतीन वर्षांच्या कालावधीत ठाणे महापालिकेत अनेक गैरव्यवहार झाले असून लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आवाज उठवल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वतः चौकशी समिती नेमली आहे. अनधिकृत बांधकामासंदर्भात दीडशेहून अधिक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी सुरू असताना एका भ्रष्ट अधिकाऱ्याला ३५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले, असेही विचारे म्हणाले.

सर्वाधिक भ्रष्टाचार ठाणे जिल्ह्यात

महाराष्ट्र राज्य गेल्या तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचारात क्रमांक एकवर आहे. सर्वाधिक भ्रष्टाचार ठाणे जिल्ह्यात झाला असून तो राजकीय आशीर्वादाने होते. संबंधित अधिकारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत आहेत. ठाणे शहरात आज वेगवेगळ्या समस्या आहेत. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, तलावांची दुरवस्था, अनधिकृत बांधकामे आणि प्रकल्पांतील भ्रष्टाचार या समस्या वाढतच आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पैसे कोणाच्या खिशात गेले

ठाण्यात वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. नागरिकांनी वारंवार आंदोलन केले, घोडबंदरपासून ठाण्यापर्यंत आवाज उठवला, पण उपाय सापडला नाही. गेल्या पाच वर्षात पालिकेचे ऑडिट झालेले नाही, तर ३३७ कोटींचा हिशोब मिळत नाही. हे पैसे कोणाच्या खिशात गेले याचा तपास होणे गरजेचे आहे, असे विचारे म्हणाले.

पक्ष आणि नागरिकांना आवाहन

शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोर्च्यात सर्व ठाणेकरांसोबत विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही सहभागी व्हावे. ठाण्याची लूट सुरू आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी आणि प्रामाणिक प्रशासनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्यासाठी मोर्चात सहभागी होऊन प्रशासनाला जाब विचारा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.