शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी यांचीही नावे चर्चेत
कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी शिवसेनेत जोरदार स्पर्धा सुरू झाली असताना पक्षातील मातब्बरांना बाजूला सारत डोंबिवलीतील राजेश मोरे यांचे नाव पक्षातून पुढे आणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पदासाठी शिवसेनेतून रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी अशा बडय़ा नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोटातून परतलेले रमेश म्हात्रे यांना महापौरपदाचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन पाळण्याचा दबाव यंदा शिवसेना नेत्यांवर असला तरी डोंबिवलीतील भाजपच्या गडातून पत्नीसह निवडून आलेले मोरे यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता शिवसेनेच्या गोटात चर्चिली जात आहे.
मागील दहा वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले डोंबिवलीतील राजेश मोरे यंदा मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. गेल्या वीस वर्षांपासून मोरे हे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत असले तरी त्यांच्या मागे मातबर असा शिक्का अजूनही लागलेला नाही. पक्षाशी निष्ठा ठेवून असल्याने यावेळचे महापौरपद मोरे कुटुंबीयांच्या घरात देण्याच्या हालचाली सेनेच्या गटात सुरू असल्याचे समजते. राजेश मोरे हे संगीतावाडी, तर त्यांची पत्नी भारती दत्तनगर प्रभागातून २२०० हून अधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेले मोरे दहा वर्षांपूर्वी माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्यासोबत शिवसेनेत दाखल झाले. संगीतावाडी, दत्तनगर हे प्रभाग त्यांच्या घरापासून दूर असले तरी आपल्या प्रभागात त्यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत. प्रभागातील रहिवाशांशी दैनंदिन संपर्क हे या दाम्पत्याचे वैशिष्टय़ आहे. या कामाचे बक्षीस म्हणून राजेश मोरे यांना महापौरपद देण्याच्या हालचाली सेनेत सुरू आहेत. या विषयी शिवसेनेचा एकही नेता उघडपणे बोलण्यास तयार नाही. मोरे यांच्याशी सतत संपर्क केला पण ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने खासगीत नाव न सांगण्याच्या अटीवर ‘या वेळी राजेश मोरे यांचा महापौरपदासाठी नंबर लागू शकतो’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

म्हात्रेंचे काय होणार?
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक भाजपमधून लढवण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी सेनेचे अधिकृत उमेदवार सुभाष भोईर यांच्या विरोधात रिंगणातून अचानक माघार घेतली. त्या वेळी त्यांना सेना नेत्यांनी पालिकेत महापौर करण्याचे आश्वासन दिले असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे रमेश म्हात्रे हेही महापौरपदासाठी जोर लावतील. पण त्यांना स्थायी समितीपद यापूर्वी देण्यात आले आहे. दीपेश पुंडलिक म्हात्रे हेही महापौरपदासाठी जाळे टाकून बसले आहेत. तरुण, युवा महापौर म्हणून आपल्याला हे पद मिळावे यासाठी दीपेश म्हात्रे प्रयत्नशील आहेत. दोन्ही म्हात्रेंना यापूर्वी मानाची पदे देण्यात आली आहेत.