या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डरांकडून योजनांच्या पायघडय़ा

फक्त दोन टक्के रक्कम भरा आणि घराची नोंदणी करा, पाडव्यापर्यंत शून्य व्याज, घर खरेदी करा ११ लाख जिंका, शून्य टक्के व्याजदराने घर खरेदी करा, सोने मिळवा, नोंदणी शुल्क मिळवा.. अशा एकापेक्षा एक आकर्षक योजना जाहीर करून मंदीच्या गर्तेत सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला उभारणी देण्याचा प्रयत्न यंदा दसरा-दिवाळीच्या मुहूर्ताला होताना दिसत आहे. ठाण्याच्या पलीकडे उभ्या राहणाऱ्या भिवंडी परिसराला नवे ठाणे, बदलापूर-अंबरनाथचा उल्लेख तिसरी मुंबई असा करीत ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्नही जोरात सुरू झाले आहेत.

मेट्रो, मोनो, महामार्गाचा विकास, एमएमआरडीए आणि रेल्वेच्या योजनांच्या भपकेदार जाहिरातीपेक्षा ग्राहकाला फायदा होईल, अशा योजना यंदाच्या दसरा उत्सवाच्या निमित्ताने विकासकांकडून राबवण्यात येत आहेत. अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलूपासून अगदी कर्जतपर्यंत पोहोचलेल्या विकासकाकडून आकर्षक योजनांचा वर्षांव होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या घराची गरजेची पूर्तता करण्यासाठी मोठय़ा गृहसंकुलांची निर्मिती झाली आहे. ठाणे शहराबरोबरच कल्याण आणि डोंबिवली शहरांच्या आसपास बराच विकास झाला आहे. या शहरांची क्षमता संपल्यानंतर अंबरनाथ, बदलापूर आणि त्या पलीकडील शहरांमधील गृहनिर्माण व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. राज्य सरकार, एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाच्या योजनांच्या आणि सुविधांच्या जोरावर या भागामध्ये नवे ठाणे, तिसरी मुंबईचा लाभ विकासकांनी घेतला. गेल्या काही दिवसांमध्ये या व्यवसायामध्ये मंदीचे सावट दिसून येऊ लागले आहे. यंदा खरेदीदारांचा कल कमी होणार हे लक्षात घेऊन दसऱ्याच्या काळात विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफरची घोषणा विकासकांकडून करण्यात आली आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागात अशा घोषणांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. तर ठाणे आणि मोठय़ा महानगरामध्ये अशा योजनांचा मागमूसही नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मंदीमध्ये असलेला हा उद्योग नवरात्रीच्या काळात बहरून आला असून यंदा खरेदीचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढणार असल्याचे विकासकांकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे शहरामध्ये घर खरेदीसाठी कोणत्याही प्रकारच्या आकर्षक योजनांची घोषणा विकासकांकडून झालेले दिसत नाहीत. असे असले तरी ठाण्यातील घर खरेदीला मोठी पसंती मिळून येत आहे. मुंबई शहराचे उपनगर असल्याने येथील रस्ते, रेल्वे आणि मेट्रोमुळे होणारी व्यवस्था आणि इतर सोई इतर शहांच्या तुलनेत चांगल्या दर्जाच्या आहे. महापालिकेकडून मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे नागरिक या भागात घर खरेदीला पसंती देत आहेत. व्यवसायामध्ये मंदी आणि सुगी असते त्यामुळे गृहनिर्माण व्यवसाय उत्सवाच्या काळात अधिक बहरून येईल.

-मुकेश सावला, संस्थापक अध्यक्ष एमसीएचआय

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recession issue in housing sector
First published on: 11-10-2016 at 01:35 IST