जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे पोलीस यंत्रणेला आदेश

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा खांबलिंगेश्वर देवस्थानाचा यात्रा उत्सव शुक्रवार, ६ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. या यात्रेला लाखोंच्या संख्येने नागरिक या ठिकाणी दाखल होतात. यामुळे यात्रा काळात परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच यात्रेत येणाऱ्या भाविक, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ५ ते १५ जानेवारी पर्यंत मुरबाड कर्जत राज्यमार्ग क्रमांक ७९ वर अवजड वाहनांसाठी वाहतूक बदल करण्यात आले आहे. या वाहतूक बदलांमुळे पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मनसे आमदार प्रमोद पाटील याचे मोदींसोबत उत्तर प्रदेशात लागले पोस्टर, दिले नोकरीचे आश्वासन, नेमकं काय घडलं?

मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील म्हसोबा देवस्थानची यात्रा ८ ते १० दिवस असते. म्हसा यात्रेकरीता ठाणे, नगर, रायगड, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक आणि इतर जिल्ह्यातून सुमारे ४ ते ५ लाख भाविक व यात्रेकरू येत असतात. यात्रेत मोठ्या प्रमाणात घोंगड्या, शोभेच्या वस्तू, विविध प्रकराची पांघरूणे तसेच बैलांचा बाजार भरत असतो. यात्रेत करमणुकीचे कार्यक्रमही होत असतात. यात्रेचे मुख्य ठिकाण मुरबाड कर्जत राज्यमार्ग क्रमांक ७९ वरील मौजे म्हसा हे आहे. मुरबाड म्हसामार्गे कर्जत हा रस्ता वर्दळीचा असून कर्जत, पुणे, पनवेल कडे जाण्यासाठीचा जवळचा रस्ता आहे. या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. यात्रा कालावधीमध्ये भाविक देखील या मार्गाने खासगी वाहनांनी प्रवास करीत असल्याने भाविक यात्रेकरूंच्या वाहनांची देखील गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यात्रा कालावधीत यात्रेकरूंना कोणताही धोका, अडथळा किंवा त्यांची गैरसोय होऊ नये व परिणामी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे ग्रामीण पोलीस यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

असे आहेत वाहतूक बदल

म्हसा यात्रेच्या निमिताने ५ ते १५ जानेवारी या दरम्यान मुरबाड येथील म्हसा नाक्यावरून म्हसा व कर्जतकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी ही जड वाहने मुरबाड बारवी डॅम बदलापूरमार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच कर्जतकडून म्हसा कडे येणारी जड वाहनांची वाहतूक बाटलीची वाडी येथून बंद करून ती कुळगांव बदलापूर मार्गे वळविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ग्रामीण पोलीस यंत्रणेला सूचित केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Route change for heavy vehicles on murbad karjat road for mhasa yatra at murbad zws
First published on: 04-01-2023 at 17:01 IST