ठाणे शहरातील स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवून ग्राहकांना आरोग्यास बाधा पोहोचविणाऱ्या सुमारे ३४३ लहान उपाहारगृहांवर अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई करण्यात आली. मुळात उपाहारगृहांना परवानगी देताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थाचा दर्जा याची पाहणी करणे गरजेचे आहे, त्याशिवाय वेळोवेळी पाहणी करून उपाहारगृहांतील पदार्थाची तपासणी करणेही आवश्यक आहे. जी उपाहारगृहे नियमांचे उल्लंघन करत असतील, त्यांचा परवाना तात्काळ रद्द केला पाहिजे.
आजकाल तरुण पिढी बाहेर खाणे अधिक पसंत करते. अशा वेळी स्वच्छतेचे निकष न पाळणाऱ्या उपाहारगृहांवर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्न विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे इतर स्वच्छता न पाळणाऱ्या उपाहारगृहांवरही चाप बसेल. शिवाय उपाहारगृहांमध्येही ताजे अन्न खाण्यास मिळेल.
– प्रदीप पाठक, डोंबिवली
मुळातच परवाना घेताना अशी तपासणी होणे गरजेचे आहे. अन्न विभागातर्फे वेळोवेळी होणारी तपासणी ही अतिशय योग्य आहे. उपाहारगृहे जेव्हा चालू होतात तेव्हा त्यांचे खाद्यपदार्थ उत्तम दर्जाचे असतात. मात्र काही दिवसांनी उपाहारगृहातील खाद्यपदार्थाचा दर्जा हळूहळू घसरतो.
– अक्षय जाधव, ठाणे</strong>
ठाण्यात नुकतीच झालेली ३४३ उपाहारगृहांवरील कारवाई अतिशय स्तुत्य आहे. ठाणे शहराचा विस्तार ज्या वेगाने वाढत गेला त्यानुसार गल्लोगल्ली लहान-मोठी उपाहारगृहे उभी राहिली. स्थानक परिसरात या उपाहारगृहांचे प्रमाण वाढले आहे. मात्र तिथे अस्वच्छता असून ती आरोग्यास घातक आहे.
– सौरभ पंडित, ठाणे
लहान-मोठय़ा उपाहारगृहाचा उपभोग सामान्य नागरिक दररोज घेत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील फास्ट फूडच्या प्रेमात या उपाहारगृहांकडे वळतात. उपाहारगृहांकडून स्वच्छतेचे पालन होत नसेल तर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ही कारवाई योग्यच ठरणार आहे. – राजश्री साठे, ठाणे
उपाहारगृहांमधील कारवाई ही खरोखरच स्वागतार्ह आहे. धावत्या जीवनशैलीचा विचार करता उपाहारगृह ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक घटक बनला आहे. त्यावर आपले आरोग्यही अवलंबून असल्यामुळे उपाहारगृहांमधील स्वच्छता व स्वास्थ्यवर्धता पडताळणीही प्रत्येक महिन्याला व्हावी. जेणेकरून हलगर्जीपणे कारभार चालविणाऱ्या लोकांवर लगाम घालता येईल.
– रोशनी खोत, डोंबिवली लासाजनक कारवाई
‘लोकसत्ता ठाणे’मधील उपाहारगृहावरील कारवाईचे वृत्त वाचले. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग खरंच जागृत असल्याचा प्रत्यय आला. आजवर अस्वच्छतेत बनविले जाणारे खाद्यपदार्थ सर्रासपणे विक्री केले जात होते. त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची काळजी कोणालाच नव्हती. अशा वेळी ही कारवाई खरोखरच दिलासाजनक आहे. वेळोवेळी प्रशासनाने अशा प्रकारची कारवाई करावी.
– धनश्री गांगन, डोंबिवली