ठाणे : मुंबई शहर वगळून मुंबई महानगर क्षेत्रातील इतर शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे देण्यात आला आहे. हा प्रभारी पदभार माळवी यांनी गुरुवारी स्विकारत या विभागातील कामांचा आढावा घेतला.
झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे जीवनमान उंचावावे या उद्देशातून राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना केली. सुरूवातीला मुंबई शहरापुरती मर्यादीत असलेली ही योजना ठाणे शहरातही लागू करण्यात आली. गेल्या काही वर्षात मुंबई महानगर पट्ट्यातील ठाण्यापल्ल्याडची शहरांचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने मुंबई शहर वगळून मुंबई महानगर क्षेत्रातील इतर शहरांसाठी स्वतंत्र ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना केली.
त्यावेळी म्हणजेच १८ सप्टेंबर २०२० रोजी या विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सतिश लोखंडे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांची बदली झाल्यानंतर याठिकाणी परग सोमण यांची ८ ऑगस्ट २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी सोमण यांचीही राज्य शासनाने वर्धा येथे बदली केल्यामुळे हे पद रिक्त होते. या पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे देण्यात आला आहे. हा प्रभारी पदभार माळवी यांनी गुरुवारी स्विकारत या विभागातील कामांचा आढावा घेतला.