लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी आता पक्षनिष्ठा बाजूला ठेवत भाजपच्या नेत्यांनी शिवसेना (शिंदेगट) प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. पालघरचे भाजपचे माजी खासदार राजेंद्र गावित, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश होताच गावित आणि तरे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांना कुडाळ येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता शिंदे सेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर भाजपच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसांपासून भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केले जात आहेत.

आणखी वाचा-भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांचा प्रवेश होताच, उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. राजेंद्र गावित यांना पालघर, विलास तरे यांना बोईसरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. संजना जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांची उमेदवारी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात देखील भाजपचे नेते संतोष शेट्टी यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली आहे.