बदलापूर: सामाजिक न्याय विभागातील निधी इतर खात्यांमध्ये वळवल्याबद्दल नाराजी व्यक्त केलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी बदलापुरात स्वतःवर झालेल्या अन्यायाबद्दल मिश्किल भाष्य केले. ‘तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यावर किती अन्याय झाला आहे. मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही’, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी बोलताना केले. ‘पण मी ७२ व्या मजल्यावर राहतो आणि आज इथून झोपडपट्टी बघतो, ज्या झोपडपट्टीतून मी आधी मोठ्या इमारती पाहायचो’, असेही शिरसाट पुढे म्हणाले.
बदलापूर शहरात शतकोत्तर शिवजयंती साजरी केली जाते आहे. ९८ वर्षांपूर्वी बदलापुरात साजरा झालेल्या शिवजयंती उत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते. ३ मे १९२७ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यामुळे बदलापूर शहराला वेगळा इतिहास लागला आहे .आजही ३ मे रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या शिवजयंतीचे औचित्य साधून यंदाच्या वर्षात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना शिरसाट यांनी शिवसेनेतील संघर्ष आणि सध्याची राजकीय स्थिती यावर भाष्य केले.
विशेष म्हणजे आदल्या दिवशी संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याचा निधी इतर विभागात वळवल्याबाबत उघड संताप व्यक्त केला होता. तसेच या विभागाची गरज नसेल तर हा विभाग बंद करून टाकावा असे उद्विग्न वक्तव्यही शिरसाट यांनी केले होते. अर्थ खात्यातील शकुनी कोण असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला होता. या वक्तव्यानंतर बदलापुरात शिरसाट यांनी हीच नाराजीची री ओढली. मात्र यावेळी आक्रमकपणे बोलण्याऐवजी शिरसाट यांनी मिश्किलपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल भाष्य केले.
‘माझ्यावर सरकारमध्ये खूप अन्याय झाले आहेत. तुम्हाला माहितीच आहे मला तर यंदा बंगलाही मिळाला नाही. मलबार हिल भागात मला बंगला मिळाला नाही, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी बोलताना केले. मात्र मी मुंबईत स्वतःच्या घरात राहतो. मी आज ७२ व्या मजल्यावर राहतो. या घरातून मला सगळी घर मुंबई दिसते. काही वर्षांपूर्वी संघर्षाच्या काळात झोपडपट्टीतून उंच इमारती मी पाहायचो आणि आज या इमारतीमधून मी घरे पाहतो. पण हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झाले आहे, असेही शिरसाट यावेळी म्हणाले.