ठाणे : नवीन ठाणे रेल्वे स्थानक, सॅटिस पूर्व प्रकल्प यांसारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी अपयशी झाले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला. सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली.
ठाणे शहरातील पूर्वेकडे सॅटीस दोन या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचे काम दोन दिवस सुरू आहे. राजन विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली. तसेच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याचा आरोप विचारे यांनी केला. शिंदे गटाचे राजकारण फोडाफोडी, दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काहीही पडले नसल्याचेही ते म्हणाले.
वाहतूक कोंडी लवकरच सुटणार
कोपरी जुना पूलावर ४.५० मीटरचे पाच गर्डर असून हे गर्डर टाकण्यात आले आहेत. त्यावर स्टील काँक्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून २.२४ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पुर्व, स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. हा प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी राजन विचारे यांना सांगितले.
संसदेत फोटो काढण्यात व्यस्त असणाऱ्यांनी विकास कामात लक्ष घालावे
या मार्गावर ५९ खांब उभे करण्यात आले. परंतु गेल्या वर्षभरापासून ब्लॉक घेण्यासाठी रेल्वे कडे पाठपुरावा नसल्याने गर्डर टाकण्यास विलंब लागला होता. सध्याचे खासदार संसदेत फोटो काढण्यात व्यस्त आहेत बहुतेक त्यांना विकास कामांकडेही लक्ष देण्यास वेळ नसावा असा आरोप राजन विचारे यांनी खासदार नरेश म्हस्के यांचावर केला.
नेमका प्रकल्प काय आहे
सॅटीस -२ या प्रकल्पाला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा झाला. २६१ कोटी आणि रेल्वे पुलासाठी ३९ कोटी अशी एकूण २९८ कोटी रुपयांची मान्यता मिळाली. दिल्लीच्या आयआरडीसी विभागाकडूनही मंजुरी घेण्यात आली. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यामध्ये सुरू झाले.