डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व भागातील चोळे गाव हद्दीतील हनुमान मंदिरासमोरील तिठ्यावर बुधवारी दुपारी एक ट्रक अचानक बंद पडला. अतिशय अरूंद अशा रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने मंदिरा समोरील तिठ्यावर तिन्ही बाजुने आलेली वाहने जागोजागी अडकून पडली. ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक परिसर, चोळे, सारस्वत काॅलनी, ९० फुटी रस्ता वाहनांनी गजबजून गेले. दुपारी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत हा प्रकार घडल्याने या रस्त्याने जाणाऱ्या अनेक शाळांच्या बस जागोजागी अडकून पडल्या.
तिठ्यावरील बंद पडलेला ट्रक बाजुला काढण्यासाठी वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक, स्थानिक नागरिक जोरदार प्रयत्न करत होते. तोपर्यंत सर्वाधिक वर्दळीच्या या रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. प्रत्येक वाहन चालक पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे मंदिराच्या तिन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शाळेच्या बस मधून शाळेत जाणारी आणि शाळेतून घरी निघालेली मुले या कोंडीत अडकून पडली. तब्बल दोन ते अडीच तास या भागात कोंडी होती.
कल्याण शहरातून ९० फुटी मार्गे डोंबिवलीत येणारी वाहने चोळे गाव हनुमान मंदिरा समोरील रस्त्यावरून धावतात. आणि डोंबिवलीतील वाहने याच रस्त्याने कल्याण भागात जातात. डोंबिवली एमआयडीसी, चोळे, भोईरवाडी भागातून धावणारी वाहने पंचायत बावडी भागातून ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागात येतात. तसेच, डोंबिवलीतील अनेक वाहन चालक पेंडसेनगर, सारस्वत काॅलनीमधून ठाकुर्ली चोळे भागातून इच्छित स्थळी जातात.
बुधवारी दुपारी एक ट्रक चालक या रस्त्याने चालला होता. अचानक हनुमान मंदिराजवळील तिठ्यावर आल्यावर या ट्रकमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि ट्रक बंद पडला. चालकाने बराच उशीर प्रयत्न करूनही ट्रक सुरू झाला नाही. स्थानिक एका वाहन तंत्रज्ञानाला वाहतूक पोलिसांनी पाचारण केले. ट्रकमधील बिघाड चालक, तंत्रज्ञानाला समजला नाही.
ट्रक रस्त्यामधून हलविण्याशिवाय चालक, वाहतूक पोलिसांसमोर पर्याय नव्हता. अरूंद रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने ट्रक बाजुला काढण्यासाठी आणलेली अवजड यंत्रणा बंद ट्रकच्या ठिकाणी नेणे अवघड होते. एका मार्गिकेतून काही वाहने बाजुला काढून अवजड वाहन ट्रकच्या ठिकाणी नेऊन ट्रक रस्त्याच्या बाजुला करण्यात आला. त्या मार्गिकेतून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. एकेक मार्गिक करून वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक अडीच तासानंतर सुरळीत केली. तोपर्यंत या मार्गिकेत अडकलेले प्रवासी, शाळकरी मुले पेंगळून गेले होते.
ठाकुर्ली भागातून अवजड वाहने नियमित धावत असतात. त्यात एखादे अवजड वाहन या भागातील अरूंद रस्त्यावर बंद पडले की चोळेगाव ठाकुर्ली रस्ता कोंडीत अडकतो. या भागातून अवजड वाहने सोडण्यात येऊ नयेत. फक्त शाळेच्या बस, लहान वाहने सोडण्यात यावीत, अशी स्थानिकांची मागील दोन वर्षापासुनची मागणी आहे. त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत.