ठाणे – ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाकडून उद्या २० ऑगस्ट २०२५ रोजी देखील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजही जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासूनच ठाण्यात पावसाचा जोर वाढलेला असून अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट रोजी दिवसभर ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचे दिसून आले. तर याच पद्धतीने आज १९ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला. तर संपूर्ण जिल्ह्याच्या तुलनेत ठाणे तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.

सोमवारी १८ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला मात्र जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केलेली नव्हती. यामुळे सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी भर पावसात शाळा गाठावी लागली. यानंतर सोमवारी दुपारच्या सत्रातील शाळा पाऊस वाढल्याने सोडून देण्यात आल्या. मात्र यानंतर खबरदारी म्हणून आज १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर उद्या २० ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.