Shahad Bridge / उल्हासनगर : कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर शहाड येथील रेल्वे उड्डाणपुलावर देखभाल दुरूस्ती सुरू असल्याने येथून अवजड वाहनांना बंद घालण्यात आली आहे. मात्र काही मोजक्या अवजड वाहनांना येथून प्रवास करू दिला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. स्थानिक कंपन्यांची ही वाहने असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जाते आहे.

शहाड येथील रेल्वे उड्डाणपूल हा कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्वाचा उड्डाणपूल आहे. दोन शहरांना हा उड्डाणपूल असला तरी कल्याण, ठाणे, भिवंडी, मुंबई या शहरांकडे येजा करण्यासाठी हा पूल गरजेचा आहे. मात्र या पुलावर गेल्या काही वर्षात सातत्याने खड्डे पडत आहेत. काही महिन्यांपूर्वी या उड्डाणपुलाला थेट भगदाड पडल्याने थेट पुलाखालील रस्ता दिसू लागला होता. त्यानंतर या पूलाचा काही भाग बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाची देखभालदुरूस्ती केली गेली.

मात्र पावसाळ्यात या पुलाला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने संथ गतीने चालतात. परिणामी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती. ही कोंडीत तासनतास तशीच असते. त्याचा फटका स्थानिक वाहतुकीलाही बसतो.

पर्याय नसल्याने याच मार्गाने वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. या पुलाच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाला आता सुरूवात करण्यात आली आहे. या पुलाच्या नुतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी २८ सप्टेंबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत या मार्गावर वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तशा आदेश काढण्यात आला.

त्यासोबतच वाहनांच्या पर्यायी मार्गांची घोषणाही करण्यात आली. त्यावरून स्थानिकांनी लहान व हलक्या वाहनांना सुट देण्याची मागणी केली. त्यानंतर हलक्या वाहनांना सुट देण्यात आली. चारचाकी कार, रिक्षा, दुचाकी, शाळांचा बस यांना यातून सुट देण्यात आली. मात्र अवजड वाहनांना बंदी कायम होती.

असे असले तरी या मार्गावर सर्रासपणे अवजड वाहने येजा करत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिस या वाहतुकीकडे कानाडोळा करत असल्याची टीकाही होते आहे. सातत्याने जाणीवपूर्वक काही वाहनांना या बंदीतून सूट दिली जात असल्याचा आरोप होतो आहे. काही वाहनांना बंदी आणि काहींना सूट असे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर स्थानिक कंपन्यांच्या वाहनांना परवानगी दिल्याची माहिती येथे कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने दिली आहे. त्यामुळे या अवजड वाहतूक बंदीचा पुरता बोजवारा उडाल्याचे बोलले जाते आहे.