कल्याण – शहापूर तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा आणि वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला सापगाव जवळील भातसा नदीवरील उड्डाण पूल सोमवारी सकाळी पुलाच्या दुरवस्थेमुळे पोलीस, वाहतूक पोलिसांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पुलाच्या नियंत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या पुलाचे संरचनात्मक परीक्षण केले जात नाही आणि पूल वाहतुकीसाठी सक्षम आहे असा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
शहापूर, मुरबाड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा, मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा सापगाव जवळील भातसा नदीवरील पूल हा महत्वाचा दुवा आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी नोकरदार, रोजंदारी कामगार, रिक्षा प्रवासी, खासगी वाहतूक करणारे, बाजारपेठेवर अवलंबून असणारा नागरिक भातसा नदी पुलाच्या सुस्थितीवर अवलंबून आहे. हा पूल सुस्थितीत असल्याने हजोरा नागरिक दररोज ग्रामीण भागातून शहापूर, आसनगाव रेल्वे स्थानक भागात प्रवास करतात.
शहापूर ग्रामीण भागातील बहुतांशी रोजंदार शहापूर, परिसरातील बाजारपेठा, लहान मोठ्या उद्योगांमध्ये नोकरी करतो. ग्रामीण भागातील अनेक रिक्षा चालक आसनगाव, शहापूर येथे प्रवासी वाहतूक करून उपजीविका करतात. ग्रामीणमधील महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुले शिक्षणासाठी शहापूरमधील शाळांमध्ये शिक्षणासाठी येतात. या सर्वांची भातसा नदीवरील पूल वाहुकीसाठी बंद करण्यात आल्याने कोंडी झाली आहे. भातसा नदीवरील पूल खराब झाला आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांना माहिती असुनही राजकीय सत्तास्पर्धा आणि या रस्त्याच्या ठेकेदारीमुळे या पुलाची डागडुजी होत नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.
सोमवारी सकाळी शहापूर डोळखांब, किन्हवली, शेणवे, धसई, शिरोशी, मुरबाड तालुक्यातील सरळगाव परिसरातून बस, रिक्षा चालक, दुचाकी स्वार, ट्रक, मालवाहू ट्रक, इतर खासगी वाहने भातसा नदीच्या दिशेने आली. रविवारच्या मुसळधार पावसामुळे नदीवरील डांबरीकरणाचा रस्ता वाहून गेला आहे. या पुलावरून भयावह परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवणे योग्य नसल्याने पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी या पुलावरील वाहतूक सोमवारी सकाळपासून बंद केली आहे. फक्त दुचाकी वाहने नंतर सोडण्यात येऊ लागली.
यामुळे अनेक वाहन चालकांनी मुरबाडमार्गे इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. नोकरदार वर्गाला पूल बंदमुळे आसनगाव रेल्वे स्थानकाकडे जाता आले नाही. मुरबाडमार्गे कल्याण रेल्वे स्थानक गाठून पुढचा प्रवास करणे दररोज शक्य नसल्याने अनेक प्रवाशांनी घरी जाणे पसंत केले. ग्रामीण भागातील बहुतांशी रिक्षा चालकांनी सापगाव ते ग्रामीण भाग अशी प्रवासी वाहतूक केली.
सुमारे साठ ते सत्तर वर्षापूर्वी बांधलेला भातसा नदीवरील पूल आता धोकादायक स्थितीत झाला आहे. पावसाचे पाणी पुलावरील रस्त्यावरील लोखंड, काँक्रीटच्या थरात मुरत आहे. त्यामुळे पुलाची डागजुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
शहापूर सापगाव येथील भातसा नदीवरील उड्डाण पूल हा तालुक्याची जीवन वाहिनी आहे. हजारो नागरिक दररोज या पुलावरून वाहतूक करतात. शहापूर आणि परिसरातील सुमारे १०० हून अधिक गावे जोडणारा हा पूल आहे. या पुलाची दुरवस्था पाहता नवीन पूल उभारणीच्या कामासाठी शासनाने लवकर पुढाकार घ्यावा. – किशोर वरकुटे, व्यावसायिक, शेणवे.