ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तीन जणांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली. पाटोळे यांना शनिवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणीनंतर पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली यांनी पत्रकारांशी संवाद साधत पाटोळे यांनी कोणतीही रक्कम मागितलेली नाही, असे म्हटले.

सरकार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयामध्ये तपासकरिता पाटोळे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या काळात आरोपीशी आणखी कोणाचा संबंध आहे का, काही खाजगी व्यक्तींचा सहभाग आहे का, याची तपास यंत्रणा पडताळणी करण्यासाठी हि मागणी केली. न्यायालयाने दिलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी तपासासाठी अत्यावश्यक आहे. या काळात बेल (जामीन) मागता येत नाही आणि न्यायालय निर्णय देईपर्यंत जामिनावरील पुढील कारवाई करता येणार नाही, असे वकील विशाल भानुशाली यांनी सांगितले.

पाटोळे यांनी पैसे स्वीकारले नव्हते

शंकर पाटोळे यांनी कोणतीही रक्कम मागितलेली नाही किंवा कोणत्याही रकमेला हात लावलेला नाही. कथित लाच व्यवहाराची घटना महापालिका इमारतीत नव्हे, तर इतर ठिकाणी घडली आहे. त्या वेळी पाटोळे आपल्या नियमित कामकाजात गुंतलेले होते, मात्र दोन्ही घटनांचा संबंध जोडून चुकीचा आभास निर्माण करण्यात आला आहे. एफआयआर आणि तपास कागदपत्रांवरूनही हे दिसून येते की अटकेच्या वेळी पाटोळे यांनी पैसे स्वीकारले नव्हते. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, तपासांती आरोपीची भूमिका आणि पुरावे स्पष्ट होतील, असे वकील विशाल भानुशाली यांनी सांगितले.

सत्य लवकरच समोर येईल

शंकर पाटोळे यांना याप्रकरणात गोवण्यात आल्याबाबत त्यांच्या कुटुंबाची कोणतीही तक्रार नाही आणि पाटोळे यांच्यावर यापूर्वी लाचलूचपत प्रति्बंधक विभागाकडून कोणताही गुन्हा नोंदलेला नव्हता. न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सुरू असून, सत्य लवकरच समोर येईल,” असे वकील विशाल भानुशाली यांनी सांगितले.