डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील दररोजच्या दोन ते तीन तासांच्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या पलावा परिसरातील नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक नागरिकांनी रविवारी शिळफाटा परिसरात बाईक रॅली काढली. या रॅलीद्वारे शासन आणि वाहतूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ही बाईक रॅली काढल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दिल्या.
पलावा परिसरात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई विरार, डहाणू परिसरात नोकरी, व्यवसाय करणारे नागरिक राहतात. या भागातील नागरिक दररोज रिक्षेने डोंबिवली रेल्वे स्थानक, खासगी वाहने घेऊन कल्याण शिळफाटा रस्त्याने प्रवास करतात. परंतु, शिळफाटा रस्त्यावर दररोज दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होत असते. या दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे आम्ही या भागात घर घेऊन चूक तर केली नाही ना, असा प्रश्न या भागातील रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे. या भागातून कोट्यवधी रूपयांचा महसूल शासन, प्रशासन वसूल करते. मग, या भागातील रहिवाशांना वाहतूक कोंडीमुक्त रस्ता उपलब्ध करून देणे हे शासन, प्रशासनाचे काम नाही का, असा सवाल पलावा भागातील रहिवाशांनी यावेळी उपस्थित केला.
कल्याण फाटा शिळफाटा चौकात दर्शक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या दर्शक यंत्रणेमुळे दोन ते तीन मिनिटात प्रत्येक मार्गिकेवरील वाहने सोडणे आवश्यक आहे. परंतु, या चौकात वाहतूक पोलीस एक ते दीड तास वाहतूक रोखून धरतात. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील प्रत्येक चौकात वाहतूक दर्शक (सिग्नल) बसविले. आणि प्रत्येक चौकातील वाहने दोन ते तीन मिनिटात सोडली तरी शिळफाटा रस्त्यावर कोंडी होणार नाही. परंतु, वाहतूक पोलीस या यंत्रणेचा अवलंब करत नाहीत. याऊलट शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसांपेक्षा खासगी वाहतूक सेवक अधिक प्रमाणात दिसतात. आणि ते भलतेच प्रकार वाहन चालकांबरोबर करताना दिसतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते, असे रहिवाशांनी सांगितले.
वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकी स्वार, चारचाकी स्वार अनेक वेळा उलट मार्गिकेतून वाहने चालवितात. वाहतूक पोलीस, सेवकांसमोरून ही वाहने उलट मार्गिकेतून धावतात. वाहतूक पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. उलट सरळ मार्गिकेतून येणारी वाहने काटई नाका भागात, जागोजागी अडवून गैरप्रकार करतात, असे रहिवाशांनी सांगितले.
पलावा चौकातील उड्डाण पूल, काटई निळजे रेल्वे मार्गावरील रखडलेल्या पुलाचे काम वेगाने होणे आवश्यक आहे. यासह या रस्त्यावरील कोंडीकडे आमदार, खासदार यापैकी कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावरील कोंडीचा प्रश्न गहन झाला आहे, असे रहिवाशांनी सांगितले. डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून शिळफाटा रस्त्याने येणे हल्ली मोठे अवघड काम झाले आहे.
बाईक रॅलीच्या मार्फत जोरदार फलकबाजी
‘आजचे स्मार्ट नियोजन उद्याचा सोपा प्रवास, वाहतूक कमी ताण कमी,’ ‘नियम मोडा, दंड भरा, स्मार्ट स्कॅन, प्रशिक्षित पोलीस, शिस्तबध्द पोलीस, वाहतूक कमी ताण कमी,’ अशाप्रकारचे फलक दुचाकीवर घेऊन नागरिकांनी बाईक रॅली काढली. दररोजच्या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांकडे शासनाचे लक्ष जावे हा या रॅली मागील उद्देश असल्याचे या भागातील रहिवासी प्रशांत दहीगर, नितीन सावंत यांनी सांगितले.