कल्याण : बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लिम समाजाकडून नमाज अदा केला जातो. या कालावधीत दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू भक्तांना जाण्यास प्रतिबंध असतो. दुर्गा देवी मंदिरातील घंटा बांधून ठेवण्यात येते. दुर्गाडी किल्ल्याजवळ जशी मुस्लिम समाजाला नमाजासाठी परवानगी दिली जाते. त्याप्रमाणे हिंदू भाविकांनाही दुर्गाडी किल्ल्यावर याच कालावधीत प्रार्थनेसाठी जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी कल्याण पश्चिमेत लालचौकी येथे शिंदे आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलने केली.

मागील अनेक वर्षापासून बकरी ईदच्या दिवशी कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेकडून हे आंदोलन केले जाते. आता शिवसेनेची दोन गटात विभागणी झाल्याने शिंदे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक शनिवारी वेगळे गट करून या आंदोलनात सहभागी झाले होते. शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली, ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे, कल्याण पूर्वेतून महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक या घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते.

शिवाजी चौक येथे शिवसैनिक जमा झाले. शिंदे गटाचे शिवसैनिक पहिले दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने दुर्गाडी किल्ला मुक्तीच्या घोषणा देत लालचौकी दिशेने गेले. त्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक लालचौकी दिशेने आले. लालचौकी येथे पोलिसांनी रस्तारोधक लावून दुर्गाडी दिशेने जाणारा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांना थेट दुर्गाडी किल्ला दिशेने जाता आले नाही.

पोलिसांनी लावलेले रस्तारोधकावर चढून आक्रमक होत दोन्ही गटाचे शिवसैनिक दुर्गाडी किल्ला दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक वेळा पोलिसांचे रस्तारोधक लोटण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून झाला. पण पोलिसांनी कडवा प्रतिकार करत रोधकाच्या पलीकडे शिवसैनिकांना येऊ दिले नाही. पोलीस शिवसैनिकांना शांत राहण्यास सांगत होते. शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी आक्रमक होते. पोलिसांनी शिवसैनिकांना लालचौकी येथेच रोखून धरल्याने शिवसैनिकांनी लालचौकी येथे मोठ्या आवाजात आरती सुरू केली. मनाई आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भागात वाहन कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी सकाळपासून दुर्गाडी किल्ला भागातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. त्यामुळे शिवसेनेचे घंटानाद आंदोलन सुरू असताना लालचौकी, दुर्गाडी किल्ला परिसरात वाहन कोंडी झाली नव्हती. अवजड वाहने पर्यायी रस्ते मार्गाने जात होती.