कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारे भागातील एका जमीन व्यवहार प्रकरणात अन्य एका विकासकाकडून फसवणूक झाल्याने कल्याणमधील शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक रवींद्र राजाराम पाटील यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित विकासका विरुध्द तक्रार केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.या जमीन व्यवहार प्रकरणी तक्रारदार रवींद्र पाटील यांनी महसूल अधिकारी, कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त, नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक नगररचना, पालिका प्रभाग अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

या तक्रारी करूनही पालिकेच्या नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालकांनी आपल्या वाद्गग्रस्त जमीन विक्री व्यवहारातील जमिनीवर इमारत बांधकाम आराखड्याला मंजुरी दिली आहे. तहसीलदार विभागाने गुन्हा दाखल विकासकाबरोबर संगनमत करून त्यांची नावे सात बाऱ्यावर नोंद केली आहेत, असे तक्रारदार शहरप्रमुख रवींद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

शहरप्रमुख रवींद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, चंद्रकला भागवत चौधरी आणि कुटुंबीयांनी रमेश दत्तात्रय कर्णिक यांच्याकडून १९८४ मध्ये विकत घेतलेल्या जमिनीवरील एक अभिन्यास भूखंड (ले आऊट) विकत घेतला होता. या भूखंडाचे कुलमुखत्यार पत्र चौधरी कुटुंबीयांनी २००८ मध्ये रवींद्र पाटील यांना दिले होते. या भूखंडाची कागदपत्रे आपल्या नावावर करून घ्यावी म्हणून पाटील यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयात प्रयत्न सुरू केले.

यावेळी पाटील यांच्या निदर्शनास आले की रमेश कर्णिक यांनी बेतुरकर कुटुंबीयांंकडून आठ सर्वे क्रमांक असलेली ३० हजार ८०० चौरस मीटरची जमीन विकत घेतली. या जमिनीचे अभिन्यास (ले आऊट) करून त्याची दस्त नोंदणी करून त्यामधील ४४ क्रमांकाचा भूखंड तुकडा भागवत चौधरी यांनी कर्णिक यांच्याकडून विकत घेतला आहे. या भूखंडावर आपली नावे लावण्यासाठी भागवत चौधरी यांनी सन १९८४ ते २००० तहसील कार्यालयात प्रयत्न केले. कल्याण तहसीलदार कार्यालयाने त्यांना सहकार्य केले नाही.

दरम्यानच्या काळात भागवत चौधरी यांचे निधन झाले आणि त्या भूखंडावर चौधरी यांच्या वारसांची नावे लागली नाहीत. तत्पूर्वीच बेतुरकर यांच्या डोंबिवलीतील वारसांनी तो भूखंड तुकडा मे. व्ही.व्ही. कन्स्ट्रक्शनचे भागीदार विमल गोवर्धन सावलीया, विनुभाई सावलीया (पटेल) यांना विक्री केला. सावलीया यांच्या दस्त नोंदणीकृत कागदपत्रांवर गंधारे येथील २६-६ चा ४४ भूखंड असा उल्लेख आहे. आणि रमेश कर्णिक यांनी खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराच्या दस्तऐवजावर २६-६ पैकी आणि इतर सात भूखंड (अभिन्यास) असा उल्लेख आहे.

बेतुरकर आणि सावलीया यांना मूळ भूखंड माहिती नसताना त्याची खात्री न करता तहसीलदार कार्यालयाने सावलीया यांचे नाव आपल्या कुलमुखत्यार असलेल्या २६-६ च्या ५५ भूखंड तुकड्यावर लावले. कर्णिक यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केलेला अभिन्यास आणि सावलीया यांच्या दस्तऐवजातील अभिन्यास दुरान्वये संबंध नाही. या अभिन्यासाच्या माध्यमातून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली. पालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेतली आहे. चौधरी यांच्या मालकीचा भूखंड आपल्या मालकी हक्कात दाखवून तो बळाकावून आपली विमल आणि विनूभाई सावलीया यांनी फसवणूक केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.