ठाणे : ठाण्यातील सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातील १९७८ आणि १९९९ साली उभारण्यात आलेल्या कोनशिलांना रंगायतनाच्या नुतनीकरणानंतर एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संताप व्यक्त केला असतानाच आता ठाकरे गटाने देखील शिंदे गटावर टीका केली. १५ ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी नाट्यगृहाच्या नव्या वास्तूचे लोकार्पण झाले. त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाची शिला दिसली नाही का? की त्यांना फक्त राजकारणासाठीच बाळासाहेबांचे व आनंद दिघे यांचे नाव आठवते? असा सवाल ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड.रोहिदास मुंडे यांनी केला.

ठाण्यातील गडकरी नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. गडकरी रंगायतन नाट्यगृहातील या नव्या वास्तूमध्ये १९७८ आणि १९९९ साली उभारण्यात आलेल्या दोन कोनशिलांना एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याने माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली होती. महापालिका आयुक्त सौरभ राव हे मनमानी कारभार चालवितात. सौरभ राव यांना ठाण्याची संस्कृती, इतिहास काय माहिती? पण जे राज्यकर्ते आहेत. जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा चालवित असल्याचे म्हणतात. त्यांनी तरी ही चूक दुरुस्त करावी असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. त्यानंतर आता ठाकरे गटानेही या मुद्द्यावरून शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.

ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड.रोहिदास मुंडे म्हणाले की, “१९७८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ठाणे येथील गडकरी रंगायतनचे लोकार्पण झाले होते. त्या वेळी त्यांच्या हस्ते उद्घानाची कोनशिला देखील उभारण्यात आली होती. व ती दर्शनीय स्थली होती मात्र नूतनीकरण झाल्यानंतर ती शिळा कोपऱ्यात ठेवण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरीच्या नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण झाले. लोकार्पण करताना त्यांना बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या हस्ते झालेल्या लोकार्पण शिला दिसली नाही का? की त्यांना फक्त राजकारणासाठीच बाळासाहेबांचे व आनंद दिघे यांच नाव आठवते?”

ऍड.रोहिदास मुंडे पुढे म्हणाले की, “स्वतःला आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवणारे, आणि खरी शिवसेना चालवतो असा दावा करणारे शिंदे यांनी या अपमानाविरुद्ध आवाज उठवला नाही, हे जनतेच्या नजरेतून सुटणार नाही. ज्यांना आपल्या थोर नेत्यांचा सन्मान राखता येत नाही, त्यांच्याकडून शिवसेनेचा वारसा जपला जाईल अशी अपेक्षाही ठेवता येत नाही. असी टीका मुंडे यांनी केली.

खरी शिवसेना ही विचार, निष्ठा आणि जनतेच्या आशीर्वादावर उभी आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचा वारसा टिकवणारी खरी शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे, आणि याबाबत जनतेमध्ये कोणताही संभ्रम नाही असेही ते म्हणाले.