कल्याण – मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवरील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून वाईट अनुभव येत होते. दिवाळी सणाच्या गोड कालावधीत कटू अनुभव आले. त्यामुळे आपल्या कार्यपध्दतीप्रमाणे काम करण्यास मिळत नसेल तर पक्षाची जागा अडवून ठेवणे योग्य नाही, म्हणून आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे ग्रामीण संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती कल्याणमधील ठाकरे गटाचे वजनदार पदाधिकारी आणि ठाणे ग्रामीण संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी माध्यमांना दिली.

दोन वर्षापूर्वी साईनाथ तारे यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठाणे ग्रामीण संपर्कप्रमुख पद दिले होते. तारे यांच्या पत्नी कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. साईनाथ तारे हे व्यावसायिक आहेत. सामाजिक, राजकीय भावनेतून ते समाजसेवा, राजकारण करतात.

आपणास पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षात असताना चांगलेच सहकार्य केले. त्यामुळे आपली पक्षप्रमुखांवर अजिबात नाराजी नाही. फक्त पक्षात कल्याण शहर परिसरात स्थानिक पातळीवर काम करताना आपणास पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून काही वाईट अनुभव आले. आपली कामाची पध्दती अतिशय काटेकोर सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. आपल्या कामाच्या पध्दतीत आणि आपल्या सहकाऱ्याच्या कामाच्या पध्दतीत फरक असेल. आणि त्यामुळे आपल्या राजकीय कामाच्या कार्यपध्दतीवर परिणाम होत असेल तर या तफावतीच्या वातावरणामुळे तेथे काम करणे योग्य नसते, असे आपले प्रामाणिक मत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कुरबुऱ्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा दिला आहे, असे साईनाथ तारे यांनी माध्यमांना सांगितले.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत तुल्यबळ लढत असताना आपण आपल्या सामर्थ्यांना बाजार समितीत आमचे उमेदवार निवडून आणले. आपण निवडणूक प्रतिष्ठेची केली नसती तर ही निवडणूक एकतर्फी झाली असती. पण आपण आपले सामर्थ्य वापरले आणि आपले उमेदवार निवडून आणले. असे असताना त्याची कदर होत नसेल. आपली कार्यपध्दती कोणाला पटत नाही म्हणून त्यामुळे आपणास त्रास होत असेल तर या तफावतीच्या कार्यपध्दतीच्या ठिकाणी काम करणे अवघड होते. आपण कुशल व्यावसायिक आहोत. त्यामुळे असल्या कुरबुऱ्या राजकारणात काम करणे आपणास जमत नाही. स्थानिक राजकीय वातावरण न पटल्याने आपण राजीनामा दिला आहे, असे तारे यांनी माध्यमांना सांगितले.

आपण पक्षप्रमुखांवर अजिबात नाराज नाही. त्यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. आपले भाजप, शिंदे शिवसेना आणि इतर पक्षातील नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत. राजकारण आणि समाजकारण असे दोन स्वतंत्र भाग करून आपण आपली वाटचाल ठेवील आहे. त्यामुळे सर्व पक्षांशी आपले चांगले संबंध आहेत. आपण कोठे जाणार हे अद्याप निश्चित नाही. पण योग्य वेळी निर्णय घेऊ, असे तारे म्हणाले. पक्षप्रमुखांनी आपणास घाईने निर्णय घेण्याची गरज नव्हती. दिवाळी संपली की भेटू, असा लघुसंदेश मोबाईलवर पाठविला आहे, असे तारे यांनी सांगितले.