कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्याच्या मागे मागील तीन महिन्यांपासून लागलेले नष्टचर्य संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पलावा चौकाजवळील काटई निळजे उड्डाण पुलाची दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ दररोज टिकेचे धनी होत आहे. त्यात आता शिळफाटा सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील खड्डे ठेकेदाराने पावसाने उघडिप देताच माती आणि खडीने भरण्याचा धक्कादायक प्रकार सुरू केला आहे. हा प्रकार पाहून या रस्त्यावर कोणा शासकीय यंत्रणेचे लक्ष आहे की नाही असे प्रश्न नागरिक करत आहेत.

कल्याण शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. त्या भागातील रस्त्याच्या मध्य भागातील पत्रे काढण्यात आले आहेत. त्या भागात आता चिखलमय परिस्थिती आहे. आणि त्याच्या बाजुला काँँक्रीट रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

पाऊस सुरू झाला की हे खड्डे पाण्याने भरतात आणि या खड्ड्यांमध्ये वाहने आपटू नयेत म्हणून वाहन चालक वाहने संथगतीने चालवितात. त्यामुळे या रस्त्यावर कोंडी होते. ही परिस्थिती कायम असताना आता पावसाने थोडी उघडिप दिली म्हणून शिळफाटा रस्त्याच्या नियंत्रक ठेकेदाराने या काँक्रीट रस्त्यावरील खड्डे ओली माती आणि खडीने भरण्यास सुरूवात केली आहे. हा सगळा प्रकार पाहून प्रवासी आश्चर्य आणि चीड व्यक्त करत आहेत.

काँक्रीट रस्त्यावरील ओली माती आणि खडी एका वेळेत दहा वाहने धावली की खड्ड्याच्या बाहेर येणार आहे. तसेच, पाऊस पडला की त्या खड्ड्यात पाणी साचून माती रस्त्यावर वाहून येईल आणि खडी परिसरात पसरेल. या खडीवर घसरून दुचाकी स्वार पडण्याची भीती आहे. याचा कोणताही विचार न करता ठेकेदार दिवसाढवळ्या शिळफाटा रस्त्यावरील खड्डे माती आणि खडीने भरत असल्याने प्रवाशांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी या सगळ्या प्रकरणी आपण एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठेकेदाराची तक्रार करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत असे सांगितले.

भगत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि समाज माध्यमांतून मनसेचे नेते राजू पाटील काटई उड्डाण पुलावरील खड्डे आणि त्याच्या दुर्दशेबाबत सतत राज्य रस्ते विकास महामंडळ, या पुलाचे राजकीय आश्रयदाते पिता पुत्र यांच्यावर सतत टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे रस्ते विकास महांडळाला या टिकेची पत्रांची दखल घेऊन कारवाई करावी लागत आहे. शिळफाटा रस्त्यावरील खड्डे, पलावा पुलाची दुरवस्था या विषयावरून एमएसआरडीसीने एकदाही संबंधित ठेकेदाराला कधी दंडात्मक नोटीस किंवा काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ठेकेदार या रस्त्याविषयी मनमानी करत असल्याच्या क्रारी आहेत. दोन वर्षापूर्वी शिळफाटा रस्त्यावरील दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती ऐवजी कडक मुरूम टाकण्याचे काम ठेकेदार करत होता. हा प्रकार उघडकीला आणल्यावर ते काम थांबले होते.