ठाणे – शहरात दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच नवी मुंबईत दोन आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात वाशी सेक्टर १४ येथील एम. जी. कॉम्प्लेक्सच्या दहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. तर कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत आई-मुलगी जळून मृत्यूमुखी पडल्या. असे असताना ठाण्यात देखील दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सहा वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने, ठाण्यातील कोणत्याही घटनेत जीवितहानी झालेली नाही.

दिवाळी सणाला सुरूवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या आनंदाने सर्वजण दिवे, पणत्या, आकाशकंदील तसेच विद्युत रोषणाईने घर सजावट करित आहेत. तसेच अनेकजण फटाक्यांची आतषबाजी करत सण साजरा करत आहेत. दरम्यान ठाणे शहरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सहा आगीच्या घटना घडल्या आहेत.

कळवा, मुंब्रा, हिरानंदनी इस्टेट, वागळे इस्टेट, वर्तक नगर, खोपट अशा विविध ठिकाणी आगीच्या घटना घडलेल्या आहेत. यात कळवा येथील विटावा परिसरात असलेल्या स्मशानभूमी बाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. तसेच वागळे इस्टेट येथील अंबिका नगर मध्ये गॅरेजला आग लागली होती.

मुंब्रा येथील बाबाजी पाटील वाडी येथे असलेल्या एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग आली होती. हिरानंदानी इस्टेट येथे बॅसिलिअस टॉवरच्या ३१ व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतील सोफा व लाकडी साहित्याला आग लागली होती. वर्तक नगर येथे हब टाऊन रेसिडेन्सी मधील १२ व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेमधील वॉशिंग मशीनला आग लागली होती. खोपट येथे एका दुकानाच्या छतावरील प्लास्टिक ताडपत्रीला आग लागल्याचे समोर आले आहे.