बदलापूर : शहरी भागात किंवा कोणत्याही खेळात रंगबिरंगी टीशर्ट घालून खेळणारे खेळाडू लहानग्यांसाठी आकर्षणाचा केंद्र असतो. आपणही कधीतरी असे टीशर्ट घालून कोणत्या तरी खेळात खेळू असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते. शहरी भागातील शाळांमध्ये किंवा शहरात मंडळ, राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण होते. मात्र ग्रामीण भागातील हे आकर्षण सहसा मोठे झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. मात्र अंबरनाथच्या एका सामाजिक संस्थेच्या संकल्पनेतून आता ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थीही त्यांच्या आंतर शाळेय क्रीडा स्पर्धांमध्ये एक टीम म्हणून खेळू शकणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आनंददायी व्हावे या उद्देशाने अंबरनाथ येथील स्पंदन फाऊंडेशन ही संस्था काम करत असते. दरवर्षी फाऊंडेशनच्या वतीने काही शाळा दत्तक घेतल्या जातात. यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश असतो. अशा शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी वस्तूचे वाटप केले जाते. काही शाळआंंना रंररंगोटी करून तर काहींना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उभारून सहकार्य केले जाते. यंदाच्या वर्षातही स्पंदन फाऊंडेशनने मुरबाड तालुक्यातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावर्षी विद्यार्थ्यांच्या क्रीडारूचीला चालना देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक टी-शर्टचीही भेट देण्यात आली.
अंबरनाथचे नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल चौधरी यांच्या स्पंदन फाऊंडेशनतर्फे दरवर्षी मुरबाडमधील दत्तक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवले जाते. यामध्ये शिरवली, तोंडली, खोंडयाचीवाडी, काकडपाडा, न्हावे, सासणे, टेपवाडी, काचकोली, चिमणीची वाडी, मोहघर, खामघर, वडाची वाडी, तळ्याची वाडी यांसह अनेक गावपाड्यांचा समावेश आहे. यंदा दप्तराऐवजी टी-शर्टचे वाटप करून विद्यार्थ्यांना आंतरशालेय स्पर्धांमध्ये एकसमान वेशभूषेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील संवेदनशील नागरिकांनी निधी देऊन हातभार लावलेला असतो. यंदाच्या या अनोख्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांना आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचेही वेध लागले आहेत.