ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात भविष्यातील प्रवाशांचा भार लक्षात घेऊन या भागातील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी १७५ नियमित पदे निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. यामध्ये तीन पोलीस निरीक्षकांचाही सामावेश आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या विमानतळ गाठण्यासाठी ठाणे- बेलापूर मार्ग, अटल सेतू, नेरुळ बेलापूर-उलवे मार्गे विमानतळ गाठता येत आहे. या विमानतळाला जोडणारा उन्नत मार्ग देखील तयार केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीचा मोठा भार या मार्गावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ६ मार्चला नवी मुंबई पोलिसांनी विमानतळ भागातील वाहतुक नियोनासाठी पदनिर्मिती करण्यासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावास २९ ऑक्टोबरला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार १७५ पदनिर्मिती केली जाणार आहे. ही पदनिर्मिती येथील वाहतुक नियोजनासाठी केली जाणार आहे.

१७५ अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये ३ पोलीस निरीक्षक, ४ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक, ६ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ४० हवालदार आणि ११४ शिपाई या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे.