ठाणे – मेट्रो, बुलेट ट्रेन, मुंबई – वडोदरा महामार्ग, विशेष मालवाहतूक रेल्वे मार्गिका यांसारखे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहे. तर समृद्धी महामार्गाची देखील जिल्ह्याला जोडणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर आता आमने येथे ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये एकूण १७६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट, बीकेसी, सीप्झसारखेच हे महत्त्वाकांक्षी ग्रोथ सेंटर असणार आहे. राज्य शासनाकडून याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक व्यवस्थेसह इतर पायाभूत विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. यातील सर्व प्रकल्पांचे काम जलदगतीने सुरु आहे. तर जिल्ह्यात असेलेले औद्योगिक क्षेत्र विस्तारासाठी देखील विविध उपायोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ठाणे जिल्ह्यात आमने येथे समृद्धी महामार्गाची सुरुवात होते. याठिकाणी आता राज्य शासनाकडून एक मोठे ग्रोथ सेंटर उभारण्यात येत आहे. आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण १७६ गावांचा समावेश आहे. यातील ४८३ चौरस किमी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.

राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील ४६ गावांसाठी सप्टेंबर २०२४ मध्ये एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी १०९ चौरस किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसीची नियुक्ती करण्यात आली होती. आता यात अनगाव सापे विकास केंद्रातील १३० गावांच्या ३७४ चौ किमी क्षेत्राचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भिवंडी १४८ व कल्याणमधील २८ गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.

आमने भागातील १७६ गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ग्रोथ सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल पार्क, लॉजिस्टिक हब, टेक्सटाइल पार्क, फार्मा अँड बायटेक पार्क, फुड प्रोसेसिंग पार्क, इनोव्हेशन पार्क, मेडिसिटी, स्पोर्ट्स अँड रिक्रीएशन हब, हेल्थकेअर क्लस्टर, अॅग्रीकल्चर हब, होलसेल ट्रेड सेंटर यांचा समावेश असेल. याच समवेत रहिवासी आणि व्यावसायिक इमारती, थिम बेस पार्क यांचाही समावेश असेल.