सृजनाची फॅक्टरी : विज्ञानाचा अभ्यास आणि नृत्याचा ध्यास..

विज्ञान शाखेच्या या विद्यार्थ्यांने नृत्याच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून करिअरचे एक नवे दालन उघडले आहे.

महाविद्यालयीन विश्वात विज्ञान शाखा म्हणजे इतरांच्या तुलनेने खूप अभ्यास करणे हे ठरलेले असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे विज्ञानशाखेचे विद्यार्थी दिवसभर पुस्तकात गढून गेलेले अथवा प्रगोयशाळेत निरनिराळे प्रयोग करण्यात मग्न असल्याचे दिसून येते. कला, संगीत, नृत्य आणि साहित्यापासून या शाखेतील विद्यार्थी बरेच दूर असतात. मुळात खूप अभ्यास असल्यामुळे या मुलांना बाकी कलांकडे आवड असूनही लक्ष देणे अशक्य असते. मात्र काही विद्यार्थी अभ्यासाच्या या धबडग्यातूनही कलेसाठी वेळ काढतात. आवड असेल तर सवड मिळते म्हणतात. तसेच ते अभ्यास आणि कलेचा मेळ साधतात. जितक्या तन्मयतेने ते अभ्यास करतात, तितक्याच एकाग्रपणाने कलेची आराधनाही करतात. कधी कधी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेला विद्यार्थीही कला क्षेत्रातील अंगभूत कौशल्याच्या जोरावर सर्वोच्च स्थान पटकावतो. ठाण्यातील आदित्य हाटे त्यापैकीच एक. विज्ञान शाखेच्या या विद्यार्थ्यांने नृत्याच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून करिअरचे एक नवे दालन उघडले आहे.

ठाण्यात राहणाऱ्या आदित्य हाटे या तरुणाच्या घरची सगळी मंडळी वैद्यकीय क्षेत्रातील असल्यामुळे त्यालाही उच्च शिक्षणासाठी विज्ञान क्षेत्रातच प्रवेश घेणे क्रमप्राप्त होते. मात्र अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतून शिकत असताना त्याला नृत्य कलेविषयी आवड निर्माण झाली, पण घरातून या गोष्टींसाठी सारखा नकार येत होता. त्यामुळे अदित्यला कनिष्ठ महाविद्यालयात असताना या आवडीनिवडी पुढे घेऊन जाणे अशक्य होते. पुढे जे. वि. एम. मेहता वरिष्ठ महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. तिथे पहिल्याच वर्षी त्याला मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवविषयी कळले. आदित्यने महाविद्यालयात असलेल्या काही नृत्यप्रेमींना जमा केले व या स्पर्धेची तयारी सुरूकेली. मुळात नृत्य स्पर्धेचा काहीच अनुभव नसल्यामुळे आदित्यला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र या अपयशामुळे निराश न होता त्याने अजून जोमाने तयारी सुरू केली व २०१० मध्ये त्यांच्या संघाने मुंबई, ठाण्यात झालेल्या स्पर्धेत तब्बल २१ पेक्षा जास्त पारितोषिके पटकावली आणि तिथून युवा कलाकार नृत्य संघाची सुरुवात झाली. पुढे अनेक स्पर्धामध्ये या संघाने विजेतेपदे पटकावली. महाविद्यालयाच्या अखेरच्या वर्षांला असताना या संघामध्ये शंभरहून अधिक युवा कलाकारांचा समावेश होता.

त्यानंतर आदित्य केवळ नर्तक राहिला नाही, तर त्याबरोबरच महाविद्यालयासाठी तो नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारीही पार पाडू लागला. याचदरम्यान त्याची ओळख दिव्या राठोड या नुकत्याच अकरावीत प्रवेश घेतलेल्या मुलीशी झाली. दिव्या खूप सुंदर नर्तिका आहे. तिनेही आदित्यसोबत सहनृत्यदिग्दर्शिका म्हणून काम सुरू केले. मुळात खूप स्पर्धेत आपली ओळख ठामपणे निर्माण केल्यावर अदित्य आणि दिव्याने आपल्या कलेला मोठय़ा स्तरावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘युवा कलाकार’ या संस्थेद्वारे त्यांनी डी. वाय. पाटील शाळेसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गेली पाच वर्षे ते या शाळेसाठी नृत्य दिग्दर्शनाचे काम करीत आहेत. शाळेसाठी दिग्दर्शन करता करता छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमात ते आपली नृत्य कला सादर करत होतेच. अशाच एका कार्यक्रमात नृत्य झाल्यानंतर त्यांची ओळख एल.टी.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेल्या एका प्राध्यापकाशी झाली. त्यांनी त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी या युवा कलाकारांना दिली. कार्यक्रम ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये झाला. तिथे उपस्थित रसिकांनी त्यांच्या नृत्य दिग्दर्शनाला भरभरून दाद दिली.

नृत्य दिग्दर्शनाकडून इव्हेंट मॅनेजमेंटकडे

एल.टी.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी काम केल्यावर त्यांना एका मोठय़ा खाजगी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली, पण यावेळी फक्त नृत्य दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. एका नामांकित खाजगी कंपनीच्या वार्षिकोत्सवाचे नियोजन करण्याचे हे काम होते. ‘उमंग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन या मंडळीनी केले. या कार्यक्रमात अडीचशेहून अधिक कंपनीतले कर्मचारी व अनेक उद्योजक सहभागी होणार होते. ‘युवाकलाकार’च्या मुलांनी हे काम याआधी कधीच केले नव्हते. त्यामुळे सगळ्यांनाच हा कार्यक्रम कसा करायचा हा प्रश्न होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी त्याचा सखोल अभ्यास सुरू केला. ‘युवा कलाकार’ संघाने भारताचे रंग या संकल्पनेवर नृत्यांचे आयोजन केले. त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पार पडला. ‘उमंग’साठी ‘युवाकलाकार’च्या मुलांनी दोन महिन्यांत ११० पेक्षा जास्त इंजिनीअरना घेऊन २३ नृत्ये बसवली. आता हा संघ नृत्य संघ नसून युवा कलाकार इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणून ओळखला जातो.

सध्या ‘युवा कलाकार’ एल.टी.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जे. वि. एम. मेहता वरिष्ठ महाविद्यालयासाठी कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. दिव्या आणि अदित्यने चेंबूरमध्ये नृत्य वर्ग सुरू केले आहेत. याबरोबरच ‘संगीतसंध्या’ हा नवा उपक्रम सुरूकेला आहे, ज्यामध्ये संगीत व लग्नाचे संपूर्ण नियोजन युवाकलाकार सांभाळणार आहेत. याच वर्षी युवाकलाकार दोन सिनेमांसाठी सहनृत्य कलाकार म्हणून काम करणार आहेत व त्याचबरोबर येत्या काही वर्षांत ‘युवा कलाकार’ या नावाने अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅपसुद्धा सुरू करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Study of science and dance