Swasth Nari Sashakt Parivar, Thane : महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या उद्देशाने सुरू झालेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय अभियानाला ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
१७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाअंतर्गत आतापर्यंत १ लाख २६ हजार ८४३ महिलांची तपासणी करण्यात आली असून, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, ॲनिमिया तसेच सिकल सेल तपासणी यांसारख्या विविध आरोग्य तपासण्या पार पाडल्या आहेत.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागांतील महिलांसाठी सर्वांगीण आरोग्य तपासणी करणे आणि जनजागृती घडवून आणणे हा आहे. ठाणे जिल्ह्यातील या अभियानाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली होत असून, अंमलबजावणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली केली जात आहे.
या अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज तपासणी आणि जनजागृती शिबिरे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ तपासणी शिबिरे, आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्राथमिक तपासणी (स्क्रिनिंग) शिबिरे आयोजित केली जात आहेत.

या अभियानात या सेवा उपलब्ध
- महिला आरोग्य तपासणी – उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंड/स्तन/गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली व महिलांसाठी ॲनिमिया तपासणी व समुपदेशन, आदिवासी भागात सिकल सेल तपासणी.
- माता व बाल आरोग्य सेवा – गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषणाविषयी मार्गदर्शन, बालकांचे लसीकरण.
- आयुष सेवा – आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, नॅचरोपॅथी आदी उपचारपद्धती.
- जनजागृती व वर्तन बदल संवाद – मासिक पाळी स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन.
- रक्तदान शिबीरे – १ ऑक्टोबर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त विशेष शिबिरे.
- नोंदणी व कार्ड वाटप – आयुष्मान भारत डिजीटल मिशन (ABDM), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) कार्ड व सिकल सेल कार्ड वाटप.
- निक्षय मित्र नोंदणी – क्षयरुग्णांना पोषण सहाय्य मिळावे यासाठी स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींना जोडणे.
या अभियानाची आतापर्यंतची आकडेवारी
- उच्च रक्तदाब तपासणी : २६,०९०
- मधुमेह तपासणी : २४,०७६
- कर्करोग तपासणी : १९,१७६
- गरोदर माता तपासणी : २,९१४
- रक्तक्षय तपासणी : १०,३९३
- बालकांचे लसीकरण : ५,०५८
- क्षयरोग तपासणी : ४,९७६
- सिकल सेल तपासणी : ३,०९४
- समुपदेशन लाभार्थी : ३१,०६६
- एकूण लाभार्थी : १,२६,८४३