कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या निधीचा वापर न करता डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर भागातील खड्डे, रस्ते मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने भरून देण्याचे काम समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गाची ठेकेदार कंपनी टाटा प्रोजेक्टसने करून दिले आहे. ही कामे करून घेण्यासाठी ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी विशेष प्रयत्न केले.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर परिसरात दिल्ली ते जेएनपीटी समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गाचे काम मागील दोन ते तीन वर्षापासून डोंबिवलीतील मोठागाव, रेतीबंदर, देवीचापाडा, कोपर भागात सुरू आहेत. या भागात रेल्वे मार्गाची बांधणी करण्यासाठी लागणारे रेल्वे ठेकेदाराचे सामान माती, सीमेंट, अवजड तुळया, इतर मालवाह वाहने या शहरी रस्त्यावरून धावत आहेत. या अवजड मालवाहू वाहनांमुळे मोठागाव रेतीबंदर रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. यापूर्वी या भागातील रस्ते कधीच खड्डे पडून खराब झाले नव्हते. या खड्ड्यांचा कल्याण, डोंबिवली परिसरातून धावणाऱ्या प्रवाशांना सर्वाधिक होत आहे, असा जिल्हाप्रमुख म्हात्रे यांचा प्रश्न होता.
याशिवाय मोठागाव रेतीबंदर खाडी किनारी गणेशघाट आहे. डोंबिवलीतील बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती रेतीबंदर खाडीवर विसर्जनासाठी नेले जातात. या भागातील खड्ड्यांमुळे रेतीबंदर घाटावर गणपती कसे नेले जातील असाही प्रश्न गणेशोत्सव मंडळांना पडला होता.
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाला गळ घालण्याची मागणी काही मंडळांनी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याकडे केली होती. परंतु, हे खड्डे समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे पडले आहेत. त्यामुळे पालिकेपेक्षा मोठागाव रेतीबंदर भागातील खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्याची कामे समर्पित जलदगती रेल्वे मार्ग बांधणाऱ्या टाटा प्रोजेक्टस कंपनीने करून देण्याची मागणी रेल्वे ठेकेदाराकडे म्हात्रे यांनी केली होती. ही कामे अनंत चतुर्थीच्या आत पूर्ण करून द्यावीत, अशीही मागणी केली होती. ही कामे वेळेत पूर्ण केली नाहीत तर या भागातील समर्पित जलदगती रेल्वेचे काम बंद पाडले जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे ठेकेदाराला दिला होता.
ठेकेदार रस्ते सुस्थितीत करून देत नाही लक्षात आल्यावर म्हात्रे यांनी मोठागाव भागातील समर्पित जलदगती रेल्वेचे काम बंद पाडले. रस्ते सुस्थितीत करा मग काम सुरू करा, अशी तंबी म्हात्रे यांनी ठेकेदार कंपनीला दिली. त्यानंतर रेल्वेचे ठेकेदार यांनी दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने खड्डे भरून देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे रेल्वे ठेकेदार कंपनीने बुधवारी रात्रीपासून मोठागाव, रेतीबंदर भागातील खड्डे पडलेले रस्ते सुस्थितीत करून देण्याचे काम पूर्ण केले आहे. अशाच पध्दतीने देवीचापाडा गावदेवी मंदिर भागातील रस्ता सुस्थितीत करून देण्याची गणेशभक्तांची मागणी आहे. या रस्त्याचा रेल्वेच्या ठेकेदाराने वापर केला आहे, असे गणेशभक्त सांगतात.
मोठागावमधील रस्ते कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुस्थितीत केल्याने प्रवाशांबरोबर गणेशभक्तांना समाधानाने या रस्त्यावरून प्रवास करता येईल, असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.