बदलापूर: बदलापुरात एका शाळेत एका शिक्षकाने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा शिक्षक वेळोवेळी मुलीला उद्देशून अश्लील आणि असभ्य भाषेत टिपणी करत होता अशी माहिती समोर आली आहे. परीक्षेचा पेपर लिहितानाही या शिक्षकाने मागे पुढे पाहिले नाही. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सरावावेळीही हा शिक्षक असभ्य वक्तव्ये करत होता. तर गुरुवारी या शिक्षकाने चुकीचा स्पर्श करत विनयभंग केल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘या’ शिक्षकाविरुद्ध आता संताप व्यक्त होतो आहे.

काही महिन्यांपूर्वी बदलापुरात चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. यातील आरोपीचा कथित चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. शाळांना वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले. सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा उपाययोजना करणे अशा अनेक सूचना देण्यात आल्या. मात्र शाळेतील मुलींना अजूनही सुरक्षित वातावरण मिळत नसल्याची बाब बदलापुरातच समोर आली आहे. येथील एका शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा शिक्षक गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी सबंधित मुलीला पाहून असभ्य आणि अश्लील टिपणी करत होता. ऑक्टोबर महिन्यात शाळेची परीक्षा सुरू असताना एका पेपर वेळी मुलीच्या वर्गात बाकाजवळ येऊन त्याने असभ्य वक्तव्य केले होते. त्यावेळी मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यानंतर नुकतीच शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना ही मुलगी नाचाचा सराव करत असताना सबंधित शिक्षकाने पुन्हा असभ्य वक्तव्य केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५ फेब्रुवारी रोजी त्या शिक्षकाने संतापजनक, अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करत छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने थेट आई वडिलांचा सुद्धा उल्लेख केला होता. मनात लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य हा शिक्षक वारंवार करत होता. तर गुरुवारी स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी नाचात सहभागी विद्यार्थ्यांना पोशाख वाटप सुरू असताना सबंधित शिक्षकाने मागून गुढगा मारून विनयभंग केला. त्यानंतर कुटुंबीयांनी आधी शाळा प्रशासन तर नंतर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर सबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पॉक्सो, अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.