बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्यात उष्णतेची लाट पहायला मिळाली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सरासरी तापमान ४० अंश सेल्सियसवर पोहोचले होते. पलावा परिसरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वाधिक ४२.१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर ठाणे, कल्याण आणि भिवंडी शहरात ४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल उल्हासनगर, डोंबिवली आणि मुंब्रा शहरातही पारा चाळिशीपार नोंदवला गेला.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पारा चाळीशीपार गेल्याचे दिसून आले आहे. उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ पहायला मिळाली. शनिवारी डोंबिवली जवळच्या पलावा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.
पलावा परिसरात कोकण हवामान या खाजगी हवामान अभ्यासकांच्या गटाने ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. तर ठाणे शहरात ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. शनिवारीही जिल्ह्याला उन्हाचा तडाखा बसला. ठाणे जिल्ह्याच्या शेजारील कर्जत शहरात पुन्हा एकदा सर्वोच्च म्हणजे ४३.१ एक अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या शहरांमधील पारा ४१ अंश सेल्सिअस वर गेला होता. तर डोंबिवली, तळोजा पनवेल, बदलापूर या शहरांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याचे दिसून आले.
सलग तिसऱ्या दिवशी तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. विशेष म्हणजे ही वाढ सकाळच्या सत्रात नोंदवली गेली. दुपारनंतर पारा लवकर उतरल्याचे ही दिसून आले. नागरिकांना घामाच्या धारांमध्ये सलग तिसरा दिवस काढावा लागला.
शहरनिहाय तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
कर्जत – ४३.१
पलावा – ४२.१
ठाणे – ४१.८
भिवंडी – ४१.५
कल्याण – ४१.३
उल्हासनगर – ४१.१
डोंबिवली – ४०.९
तळोजा – ४०.९
पनवेल – ४०.८
बदलापूर – ४०.७
मुंब्रा – ३९