ठाणे : उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या आणि कुटुंबियांच्या सांगण्यावर आपल्या एक महिन्याच्या बालिकेला कळव्यातील एका कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय १० हजार रुपयात दत्तक दिले असल्याची माहिती उघड झाली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बालिकेला दत्तक दिले असल्याची माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून कारवाई करत कळव्यातील संबंधित कुटुंबियांकडून बालिकेला ताब्यात घेऊन जननी आशिष दत्तक संस्था डोंबिवली येथे दाखल करण्यात आले आहे.

आपल्या कौटुंबिक अडचणींमुळे तसेच पैश्यांच्या हव्यासासाठी अनेकदा कोणतेही कायदेशीर प्रक्रिया न राबवता नवजात बालकांची दत्तक प्रक्रिया राबविल्याची विविध प्रकरणे ठाणे जिल्ह्यांतून अनेकदा समोर आली आहेत. जानेवारी महिन्यात उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने बालिकेला जन्म दिला. उल्हासनगर येथेच राहणाऱ्या एका तरुणासमवेत ही तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तरुणी गरोदर असताना तिच्या समवेत राहणाऱ्या तरुणाने पालकत्व स्वीकारण्यास तयारी दर्शविली. मात्र बालिका जन्माला आल्यावर आपली आर्थिक परिस्थिति खराब असून आपण त्या बाळाला सांभाळू शकत नसल्याने ते बाळ एका गरजू कुटुंबाला देण्याचे दोन्ही पालकांनी ठरवले. यानंतर कळव्यातील एका कुटुंबाला दोघांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया न राबविता बालिका कळव्यातील एका कुटुंबाला दत्तक दिले. सखी केंद्राला बाळाच्या खरेदी विक्री झाल्याबद्दल लक्षात येताच महिला बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कळवा येथील झोपडपट्टीत बाळाचा शोध घेउन त्या बालकाला ताब्यात घेतले.

बाळाची परिस्थिती ठीक नाही हे लक्षात येताच बाल कल्याण समिती ठाणे यांच्या आदेशान्वये बाळाला उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले. दवाखान्यातून बाळाला सोडल्यानंतर बाल कल्याण समिती समोर हजर करून त्याला जननी आशिष दत्तक संस्था डोंबिवली येथे दाखल करण्यात आले आहे. तर बालकाची विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोन्ही पालकांवर जिल्हा बालसंरक्षण कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून बाल न्यायालयाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

आईनेच केली पुन्हा बालिकेची मागणी

जानेवारी महिन्याच्या अखेरीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय ठाणे येथे १८१ या हेल्प लाईनला संबंधित बालिकेच्या आईनेच म्हणजेच २१ वर्षीय तरुणीची फोन करून कौटुंबिक वादाची माहिती दिली. सखी केंद्र १ यांच्या माध्यमातून त्वरित महिलेला संपर्क साधण्यात आला आणि तिला उल्हासनगर येथील कार्यालयात बोलावून घेण्यात आले. यावेळी संपूर्ण प्रकार सांगत बालिकेला पुन्हा देण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालकांची खरेदी – विक्री करणे तसेच बेकायदेशीर रित्या बाळाला दत्तक देणे ही कायद्याने गुन्हा आहे. जर पालकांना बाळ दत्तक घ्यायचे असेल तर त्यांनी cara.gov.wcd.in या वेब साईट वर जाऊन तेथे नोंद करणे आवश्यक आहे व ही प्रक्रिया कायदेशीर दत्तक प्रक्रिया आहे. तसेच मदतीसाठी हेल्प लाईन क्रमांक 1098 येथे संपर्क साधावा संतोष भोसले, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे