अंबरनाथ : हृदयविकाराचा झटका आल्याने अंबरनाथच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी पुढील रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे. दरम्यान याचवेळी अंबरनाथ शहरात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आली होती, असाही आरोप होतो आहे.
अंबरनाथ येथील स्वामी नगर येथे राहणाऱ्या मीना सुर्यवंशी यांना रविवारी सायंकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने जवळच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुर्यवंशी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे किंवा मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात हलविण्याचे सांगण्यात आले.
मात्र रुग्णालयात त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप आहे. त्याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथ येथे नव्याने बांधलेल्या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांच्या सुरक्षा ताफ्यासाठी डॉ . बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका पाठवण्यात आली होती, अशी माहिती आहे. ताफ्यात रुग्णवाहिक पाठवली नसती तर महिलेला पुढील उपचारासाठी वेळेत नेता आले असते, असा आरोप आता केला जातो आहे.
मात्र रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. मीना सूर्यवंशी या ६६ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना शेजाऱ्यांनी रुग्णालयात आणले होते, अशी माहिती या रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी दिली आहे. त्यांना रुग्णालयात आणले त्याचवेळी त्यांची स्थिती नाजूक होती. त्यांचे पल्स मिळत नव्हते. त्यांच्यावर सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार आणि तपासणी केली जात होती. त्याचवेळी त्यांना इतर रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालयाची रुग्णवाहिका शेजारीच होती. मात्र त्यांचा १५ मिनिटात मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही हा आरोप चुकीचा असल्याचेही डॉ. शुभांगी यांनी सांगितले आहे.
यापूर्वीही उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात गंभीर रुग्णाला पुढील रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ग्रामीण भागात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने झोळीतून नेण्याची वेळ आल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांचे जाळे अधिक घट्ट करण्याची मागणी होते आहे.