Durga Pooja / ठाणे – पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजेची परंपरा आता ठाण्यातील बंगाली भाषकांसोबतच इतर ठाणेकरांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. नवरात्रोत्सवाच्या पंचमीपासून सुरू होणारा हा दुर्गोत्सव यंदा ठाण्यातील वाघबीळ, कोलशेत, हायलँड, भाईंदर अशा विविध ठिकाणी पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात देवीची भव्य मूर्ती, त्यासह सरस्वती, लक्ष्मी, गणपती, कार्तिक आदी देवतांच्या मूर्ती अशी एकत्रित पूजा करण्यात येते. यामुळे ठाणेकरांना उत्सवातील वेगळेपणा अनुभवता येणार आहे.
शिकोरेर खोजे एमराल्ड हिलसाईड बंगाली असोसिएशन यांच्या वतीने भाईंदर-घोडबंदर रोड येथे २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दुर्गोत्सव होणार आहे. असोसिएशनचे अर्णव बनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात ग्रामीण बंगालची झलक दाखवणारा मंडप आणि १० फूट उंचीची पारंपारिक मॉं दुर्गेची मूर्ती याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, पारंपरिक सजावट आणि बंगाली खाद्यपदार्थांची मेजवानी ठाणेकरांना मिळणार आहे.
नब प्रयासी दुर्गोत्सव यांच्यावतीने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान कोलशेत रोडवरील हेरिटेज हॉटेल येथे दुर्गा पूजाचे आयोजन केले आहे. पंचमीपासून दशमीपर्यंतचा संपूर्ण सोहळा होणार आहे. बंगीया परिषद, ठाणे यांच्यावतीने दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कौशिक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे ६३ वर्ष आहे. या उत्सवात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, नृत्य, दशमी पूजा, सिंदूर महोत्सव असणार आहे. हा उत्सव शनिवार, २७ सप्टेंबर ते गुरूवार, २ ऑक्टोबरपर्यंत हायलँड गार्डन, ठाणे येथे असणार आहे.
प्रेस्टीज रेसिडंसी यांच्यावतीने तसेच तन्मय चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शनिवार, २७ सप्टेंबर ते गुरूवार, २ ऑक्टोबर पर्यंत देवदर्शन मैदान, वाघबीळ येथे होणार आहे. या उत्सवात विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
त्याचप्रमाणे न्यु बंगाल क्लब यांच्यावतीने आणि प्रबीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा पूजाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्थापनेचे २४ वे वर्ष आहे. उपवन लेक मैदान, पोखरण रोड नं. २ येथे कोचबिहार पॅलेसची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. बंगालच्या अद्वितीय वास्तुकलेचे दर्शन या उत्सवात ठाणेकरांना होणार आहे.