Navi Mumbai International Airport : ठाणे : येत्या ८ ऑक्टोबर रोजी उलवे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जाणार असून यासाठी भाजप ठाण्यातून नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने दीडशे बस गाड्या रवाना करणार आहे.

देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून कार्यक्रमासाठी भव्य तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस सुमारे ४०० कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, वागळे, लोकमान्यनगर, ज्ञानेश्वर वैतीवाडी, वर्तकनगर, ओवळा, ब्रह्मांड, बाळकुम, मानपाडा, राबोडी, वृंदावन, पाचपाखाडी, नौपाडा, कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा अशा १८ मंडळांमधील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख आणि बूथप्रमुख यांनी या तयारीत सक्रिय सहभाग घेतला आहे.

नियोजनासाठी विशेष समिती

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. यात भाजप पदाधिकारी सचिन पाटील, राजेश मडवी, समीर भारती, विक्रम भोईर, तृप्ती पाटील, गौरव सिंग, भास्कर ची बैरी आणि शेट्टी यांचा समावेश आहे. विधानसभा स्तरावरही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

दीडशे बसगाड्या सोडणार

ठाणे शहरातील ३३ प्रभागांमधून सुमारे १५० बसेस कार्यकर्त्यांसह उलवे येथे रवाना होणार असल्याची माहिती पक्ष प्रवक्ते सागर भदे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, त्यासाठी आपल्या क्षेत्रातून बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. या बस द्वारे कार्यक्रमस्थळी येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला होणारे थेट संबोधन ऐकावे, असे आवाहन भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केले.