ठाणे : ठाणेकरांना बोरीवली गाठता यावी यासाठी भारतातील सर्वांत मोठ्या आणि लांब बोगद्याची निर्मिती सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली अर्थात नॅशनल पार्कमध्ये सुरु आहे. हा प्रकल्प केव्हा पूर्ण होईल याची अनेकजण वाट पाहत आहेत. तर काहीजण या प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पाची नेमकी स्थिती काय आहे जाणून घेऊया…
ठाणे, भिवंडी, कल्याणकरांना बोरीवली गाठण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो. परंतु या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे. घोडबंदर घाट रस्त्यात दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असून कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे ठाणे -बोरीवली प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या सुरु आहे. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब असून दुहेरी बोगदा आहे.
काय आहे प्रकल्पाचे वैशिष्ट्य
– मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधला जाणारा हा ११.८ किमी लांबीचा भूमिगत बोगदा ठाणे-घोडबंदर रोडला थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणार आहे. या बोगद्यामुळे सध्याचा ६० ते ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.
टनल बोरिंग यंत्रणा..
– हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जात असल्याने,पर्यावरणास हानी न पोहोचवता काम पार पाडण्यासाठी अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन (टीबीएम) चा वापर केला जात आहे. या मशीनमुळे भूमिगत खोदकाम सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होत आहे असा दावाही एमएमआरडीए करत आहे.
बोगद्याची वैशिष्ट्य
– या दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गिका असतील. त्यापैकी एक आपत्कालीन मार्गिका असेल. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर क्रॉस-पॅसेजेस असतील. तसेच प्रगत वायुवीजन प्रणाली, अग्निशमन यंत्रणा, धूर संवेदक आणि एलईडी दिशादर्शक फलक यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा बसविल्या जात आहेत.
प्रकल्पाची सद्यस्थिती
– ठाणे बाजूची टीबीएम लॉन्चिंग शाफ्ट खोदकाम प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हे काम मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु होते.
– कास्टिंग यार्ड (ठाणे) : पूर्ण झाले असून कार्यरत आहे.
– बोरिवली यार्ड : उभारणीच्या टप्प्यात आहे.
– जमीन अधिग्रहण : ठाणे येथे बहुतांश पूर्ण.
– पुनर्वसन : बोरिवली येथे सुरू आहे.
– ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ ही दोन टीबीएम यंत्रणा चेन्नईतील एका कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहेत.
पूर्ण झाल्यानंतर हा ऐतिहासिक प्रकल्प प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार, वाहतूक कोंडी कमी करणार, प्रदूषण घटवणार आणि नागरिकांना वेगवान, स्वच्छ आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणार असल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले.
