ठाणे : ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीतून दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ कळके यांच्यावर असून या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी कळ‌के यांना शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणातील दोन जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे. जोशी एंटरप्रायझेस कंपनीचे भागीदार सुनिल गंगाधर लिमये यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. मे. जोशी एंटरप्रायझेस ही कंपनी कौस्तुभ कळके यांनी सुरू केली होती. या कंपनीत २१ जुलै २०२२ मध्ये सुनिल लिमये आणि जयंतीलाल जैन हे दोघे भागीदार झाले. या कंपनीचे जुन्या ठाण्यात म्हणजेच नौपाडा, तीन हात नाका, चरई आणि पाचपखाडी भागात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या कंपनीतील भागीदारांमध्ये वाद झाले असून हा वाद आता पोलिस ठाण्यात पोहचला आहे.

हेही वाचा…कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागातील दोन कर्मचारी अटकेत, इमारत आराखडा मंजूर करताना गुरचरण जमिनीचा खासगी जमिनीत समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौस्तुभ यांनी कामिशा दानबहाद्दुर सिंह आणि सुंदरराज हेगडे यांनी आपसात संगनमत करून सुनील आणि जयंतीलाल यांना कंपनीतून बाहेर काढण्यासाठी निवृत्ती करारावर त्यांच्या खोट्या स्वाक्षरी केल्या आणि ही कागदपत्रे बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केली. असा आरोप सुनील लिमये यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कौस्तुभ यांना शुक्रवारी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कामिशा सिंह आणि सुंदरराज हेगडे या दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.