Thane Accident News – घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर शुक्रवारी मध्यरात्री एका कारचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल झाले. या अपघातामुळे पातलीपाडा पुलावरील ठाणे घोडबंदर वाहिन्यांची वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
शैलेश सरोदे (२७) असे कार चालकाचे नाव आहे. ते एकटेच शुक्रवारी मध्यरात्री कारने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून घोडबंदरच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांची कार घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर येताच कार चालक शैलेश सरोदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात सरोदे हे किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल झाले. यावेळी सरोदे यांना किरकोळ दुखापत झाल्याने जवळील रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करिता दाखल करण्यात आले. या अपघातामुळे वाहनामधून रस्त्यावर तेल सांडले होते. यामुळे ठाणे घोडबंदर वाहिनीवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सांडलेल्या तेलावर माती पसरविण्याच आली. अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करण्यात आले असून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्यात आला.
ठाण्यातील घोडबंदर रोड हा शहरातील सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे पश्चिमेकडून पालघर, गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा प्रमुख मार्ग असल्याने येथे नेहमीच मोठी वाहतूक असते. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात झाल्यास वाहतूक विस्कळीत होऊन वाहनचालकांची गैरसोय होते. मागील महिन्यात देखील अशीच एक घटना पातलीपाडा पुलावार घडली होती. ट्रक चालक आणि त्याचा सहकारी हे दोघे सुमारे ८ टन लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन नवी मुंबईहून गुजरातच्या दिशेेने वाहतूक करत होते. यावेळी ट्रक पातलीपाडा पूलावर येताच ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते. यामुळे ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबावर आदळला होता. या अपघातात ट्रकमधील लोखंडी पाईप आणि रॉड रस्त्यावर पडले होते. तर चालकासह सहकारी जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. त्यापाठोपाठ शुक्रवार मध्यरात्री पुन्हा अपघात होऊन कार चालक किरकोळ जखमी झाला आहे.