ठाणे – शारदीय नवरात्रौत्सवाची ठाण्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण पसरले आहे. पारंपरिक पद्धतीने देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना, भव्य मंडप, लखलखणारी रोषणाई, आकर्षक सजावट आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे ठाणे शहर झगमगून गेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक शहरातील देवींच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

ठाणे शहरात शारदीय नवरात्रौत्सवाची सुरूवात झाली असून शहरातील प्रत्येक चौक, गल्ली आणि रस्त्यांत उत्सवाचा रंग चढला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागत असून ‘जय अंबे गौरी’चा गजर वातावरणात दुमदुमत आहे. पारंपरिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि गरबा-दांडियाच्या ठेक्यांनी नवरात्रोत्सव अधिकच रंगतदार झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील काही मानाच्या देवी भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहेत. त्यात टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी देवीचे विशेष महत्त्व आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या मंडळात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्यात यंदा या ठिकाणी बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा साकारण्यात आला आहे. हा आकर्षक देखावा भाविकांचे लक्ष वेधत आहे.

तसेच वागळे इस्टेटमधील रघुनाथ नगर परिसरात संकल्प प्रतिष्ठान म्हणजेच शिवसेना (शिंदेगट) नेते रविंद्र फाटक यांच्यावतीने नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी राजस्थानच्या जयपूरहून आणलेल्या संगमरवरी दगडातून जयपूरच्याच कारागीराने संपूर्ण मंदिर उभारलेले आहे.

नवरात्रीच्या दिवसात या मंदिरामध्ये सजावट केली जाते. या देवीची मूर्ती कायमची स्थायी स्वरूपी असून नवरात्रीमध्ये इथे घटस्थापना केली जाते. यामुळे या ठिकाणी देखील भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. त्याचप्रमाणे नवयुग मित्र मंडळच्यावतीने मानपाडा परिसरात नवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाच्या वतीने श्री अंबे माँ या देवीची प्रतिष्ठापना दरवर्षी केली जाते.

यंदा या मंडळाच्यावतीने पारंपरिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये अनेक समाजांचे विविध उपक्रम राबवण्यात आले. त्य़ाचबरोबर सप्तश्रृंगी पाठ, हरिपाठ, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा, हवन, महाप्रसाद, मुख्यमंत्री आरोग्य तपासणी शिबिर, महिलांसाठी कॅन्सर नमोग्राफी कॅम्प असे विविध कार्यक्रम देखील ठेवण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे शिवाईनगर, चंदनवाडी, कळव्यातील संघर्ष नवरात्री उत्सव, एकता मित्र मंडळ, पाचपाखाडी, शास्त्रीनगरची देवी अशा अनेक ठिकाणी देवींची प्रतिष्ठापना तसेच रास गरबांचे आयोजन केले आहे. या नवरात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी केवळ ठाणेकरच नाही, तर मुंबई आणि उपनगरांतील नागरिकही मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.