Thane health news : ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत शेकडो बालकांना नवे जीवनदान मिळाले आहे. “बालपण निरोगी तर भविष्य उज्वल” या ध्येयाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत गेल्या पाच वर्षांत तब्बल ६९७ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया तर ४,६८२ बालकांवर इतर गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी ते शाळा स्तरावर आरोग्य तपासणी आणि मोफत उपचार ही मोहीम व्यापक पद्धतीने राबविल्यामुळे अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचा नवा प्रकाश फुलला आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केवळ एप्रिल २०२५ पासून आजपर्यंत ३३ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांतील शिबिरांद्वारे हर्निया, फायमोसिस, चरबीच्या गाठी, चिकटलेली बोटे, टंग टाय, फाटलेले ओठ-टाळू, डोळ्यांचा तिरळेपणा अशा आजारांवर तब्बल ३०७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असून अनेकांना आरोग्यपूर्ण आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या ५ वर्षांत या कार्यक्रमाअंतर्गत ६९७ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया आणि ४ हजार ६८२ बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे आयोजित विशेष शिबिरात सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात तब्बल १०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ऐतिहासिक विक्रम घडला असल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विनोद जोशी यांनी दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ३२ पथके सातत्याने अंगणवाडी आणि शाळांमध्ये जाऊन बालकांची तपासणी, उपचार तसेच शस्त्रक्रियेनंतरचा पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक पथकात महिला आणि पुरुष वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता तसेच सहाय्यक परिचारिका कार्यरत असून, त्यांचा समर्पित प्रयत्नामुळे अनेक लहानग्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजळतो आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे काय ?
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK – Rashtriya Bal Swasthya Karyakram) हा भारत सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू केलेला महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश देशातील बालकांचे बालपण निरोगी ठेवणे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे असा आहे. नवजात शिशु, अंगणवाडीतील बालक, शालेय विद्यार्थी यांची या उपक्रमात आरोग्य तपासणी केली जाते. हृदय, डोळे, कान, मानसिक आरोग्य, कुपोषण अशा आजारांवर विशेष लक्ष दिले जाते. या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलांना मोफत उपचार मिळतात.
“बालकांचा जीव वाचला की, फक्त घर नाही तर, संपूर्ण समाज उजळतो,” याची जाणीव करून देत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात बाल आरोग्याचा खंबीर पाया घालत आहे. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.