ठाणे – दिवाळी सणाला सुरूवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी निमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ठाण्यातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, तोरण, विद्युत रोषणाई, घरसजावटीचे साहित्य, पुजेचे साहित्य तसेच गृहपयोगी वस्तू, कपडे घेण्यासाठी नागरिकांनी शुक्रवारी बाजारात गर्दी केली होती.
ठाणे शहरात राममारूती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, नौपाडा, गावदेवी परिसर या शहरातील मुख्य बाजारपेठा आहेत. यापैकी जांभळी नाका बाजारपेठ ही महत्वाची बाजारपेठ मानली जाते. धान्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्वच साहित्य एकाच बाजारपेठेत उपलब्ध होते. तसेच या बाजारात अधिक प्रमाणात व्यापारी वर्ग हा होलसेल विक्रेता आहे. त्यामुळे अनेक ग्राहक याठिकाणी येऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. यामुळे या बाजारपेठांमध्येही रेलचेल सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठा विद्युत रोषणाई आणि आकाशकंदीलांनी सजवण्यात आल्या आहेत. यामुळे बाजारपेठांना यंदा आकाशकंदीलांच्या नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत. यात राजस्थानी कापड कंदील, कागदी कंदील, वेलवेट तसेच थ्रीडी प्रिंटचे कंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. तसेच बाजारात मातीचे, काचेचे, मेणाचे तसेच विविध नक्षीदार दिवे, घराच्या सजावटीसाठी फुलांच्या माळा, कृत्रिम फुलांचे तोरण आणि मण्यांच्या डिझाईनचे तोरण, विद्युत रोषणाई खरेदीला नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे इलेक्ट्राॅनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, पुजेचे साहित्य खरेदीला देखील नागरिकांनी पसंती दर्शवली.
ठाणे शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा या मार्गांवर विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे शहराला उत्सवाचे रुप प्राप्त झाले आहे. गोखले रोडवरील काही दुकानांमध्ये ग्राहकांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे. तसेच दिवाळीनिमित्त विविध सवलती देखील व्यापारी देत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्येही खरेदीचा उत्साह कायम आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळी नाका बाजारपेठेत बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.