ठाणे : दिवाळी खरेदीनिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी ठाणे बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात नागरिक खरेदीसाठी गेले होते. या गर्दीमुळे ठाणे बाजारपेठेतील वाहतुक वळविण्यात आल्याने त्याचा परिमाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. ठाण्यातील कोर्टनाका, टेंभीनाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले.
दिवाळी निमित्ताने शुक्रवारपासून ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले असून पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा भार वाढून कोंडी होऊ लागली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील कोर्टनाका, टेंभीनाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, कारागृह मार्ग, उथळसर भागात वाहतुक कोंडी झाली. सिडको मार्गावरही सिडको, कळवा नाका पर्यंत कोंडी झाली. मुंबईत कामानिमित्ताने गेलेला नोकरदारवर्ग सायंकाळी नोकरदार घरी परतत असतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत घरी पोहचता आले नाही. वाहतुक कोंडीत महिला वर्गाचेही हाल झाले.