ठाणे : दिवाळी निमित्ताने ठाणे बाजारपेठ, जांभळीनाका येथे खरेदीसाठी नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. या गर्दीमुळे अपघात आणि कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी बाजारपेठ परिसरात वाहतुक बदल लागू केले आहे. हे वाहतुक बदल दररोज २३ ऑक्टोबरपर्यंत दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत लागू असतील.

जांभळीनाका येथून ठाणे बाजारपेठेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना जांभळीनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जांभळीनाका येथून उजवे वळण घेऊन टाॅवरनाका मार्गे वाहतुक करतील. खारकरआळी येथून बाजारपेठ, जांभळीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना महाजनवाडी सभागृह येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारकरआळी येथून ठाणे महापालिका व्यायामशाळा, एनकेटी महाविद्यालय, कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुक करतील.

ठाणे ट्रेडर्स दुकान येथून मंहमद अली रोड, जांभळीनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना (दुचाकी वगळून) ठाणे ट्रेडर्स दुकानाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने महागिरी मशीद येथून वाहतुक करतील. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथून बाजारपेठेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना जवाहर बाग, अग्निशमन दल केंद्र येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राघोबा शंकर मंदिर रोड मार्गे वाहतुक करतील. अशोक सिनेमा आणि नॅशनल इलेक्ट्रिक दुकानाजवळून बाजारपेठेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना (दुचाकी वगळून) माटे चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दत्त मंदिर येथून सिडको मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल शुक्रवारपासून सुरु झाले असून २३ ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत लागू असेल.