ठाणे – घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत यावरून रात्री बारा नंतरच जड वाहने सोडण्यात यावी असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बैठक घेतली. या दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जेएनपीटी व अहमदाबाद हायवे-पालघर मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी आच्छाड व चिंचोटी यांसारखे इतर ‘होल्डिंग प्लॉट्स’ निश्चित करण्यावर भर देण्यात आला. तर शहरातील प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ठराविक वेळेचे नियोजन (टाइम झोन) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक घेण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना आवश्यकतेनुसार वाढीव मनुष्यबळ तैनात करण्याचे आदेश दिले होते.तर जेएनपीटीकडून घोडबंदरकडे येणाऱ्या वाहनांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेशबंदी ठेवावी, असे निर्देश जेएनपीटीचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिले होते.
अहमदाबादकडून येणाऱ्या वाहनांचे नियोजन मीरा-भाईंदर व पालघर पोलिस तसेच जिल्हाधिकारी यांनी एकत्रितपणे करावे, तसेच आच्छाड व चिंचोटी येथे जड वाहनांसाठी तात्पुरत्या पार्किंगची सोय करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जेएनपीटी व अहमदाबाद हायवे-पालघर मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी ‘होल्डिंग प्लॉट्स’ निश्चित करण्यावर भर देण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ठराविक वेळेचे नियोजन (टाइम झोन) करण्याचा निर्णय घेण्यात आला. घोडबंदर रोड, माजिवडा जंक्शन, भिवंडी बायपास, चिंचोटी, शिळफाटा आणि कल्याण बायपाससारख्या नेहमीच कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेऊन वाहतूक नियंत्रणासाठी तातडीचे पावले उचलण्याचे ठरविण्यात आले.
तसेच, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व देखभाल, पर्यायी मार्गांचा वापर, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना यावरही चर्चा झाली. या बैठकीमुळे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा निघून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केला. त्यांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले.